शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले
By नितीन चौधरी | Published: December 3, 2024 08:59 AM2024-12-03T08:59:37+5:302024-12-03T09:02:52+5:30
गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.
पुणे : जिल्ह्यात कोरोना काळात अनेकांना क्षुधातृप्तीसाठी आधार देणाऱ्या शिवभोजन केंद्रांची संख्या ४० इतकी होती. मात्र, अवेळी मिळणारे अनुदान, नागरिकांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल २१ केंद्रे बंद झाली आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत असलेले ४० शिवभोजन केंद्रे सध्या केवळ ७ तालुक्यांमध्येच १९ इतकेच उरले आहेत. या केंद्रांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदानही मिळाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे शिवभोजन थाळीची योजना चालविली जाते. ही योजना महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाली होती. २०२३च्या मार्चअखेर जिल्ह्यात अशी ४० केंद्र सुरू होती. मात्र, राज्य सरकारकडून अनुदान वेळेत न मिळत असल्याने केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. परिणामी, अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात केवळ १९ केंद्रे सुरू असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे. अनुदानाव्यतिरिक्त विकलेल्या थाळ्यांचा हिशेब ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणे अशा जिकरीच्या अटी तसेच नागरिकांचा अल्प प्रतिसादही केंद्र बंद होण्यामागील कारण आहे.
जिल्हा पुरवठा विभागाने २३ जूनपर्यंत शिवभोजन केंद्रांना अनुदान वितरित केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून एकूण २ कोटी ८२ हजार ५१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. संबंधित तहसीलदारांकडून सप्टेंबरपर्यंतचे शिवभोजन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, या कालावधीचे अनुदान शिवभोजन केंद्रचालकांना चार-पाच दिवसांत वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, या १९ केंद्रचालकांना गेल्या पाच महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहा रुपयांत काय मिळते?
दहा रुपयांच्या या शिवभोजन थाळीत २ चपात्या, एक वाटी भाजी, १ मूद भात व एक वाटी वरण दिले जाते.
केंद्रांना मिळते २५ आणि ४० रुपयांचे अनुदान
या केंद्रांना राज्य सरकारकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. त्यात ग्रामीण भागातील केंद्रांसाठी २५ रुपये तर शहरी भागासाठी ४० रुपयांचे अनुदान दिले जाते.
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र
बारामती ४
हवेली ६
पुरंदर ३
आंबेगाव १
दौंड २
मावळ १
खेड २
एकूण १९