सामाजिक सलोखा राखण्यासाठी शिवजयंती व भीमजयंती संयुक्त महोत्सव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 08:58 AM2018-04-16T08:58:11+5:302018-04-16T08:58:11+5:30

तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने माय मावळ फाऊंडेशन व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळात नुकताच शिवजयंती व भीमजयंती हा संयुक्त जयंती महोत्सव कामशेत याठिकाणी संपन्न झाला.

Shiv Jayanti and Bhim Jayanti Joint Celebration to maintain social reconciliation | सामाजिक सलोखा राखण्यासाठी शिवजयंती व भीमजयंती संयुक्त महोत्सव 

सामाजिक सलोखा राखण्यासाठी शिवजयंती व भीमजयंती संयुक्त महोत्सव 

googlenewsNext

लोणावळा : तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने माय मावळ फाऊंडेशन व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळात नुकताच शिवजयंती व भीमजयंती हा संयुक्त जयंती महोत्सव कामशेत याठिकाणी संपन्न झाला. संपूर्ण शिंदेशाही गायकांचा एकत्रित गायनाचा पहिलाच प्रयोग यानिमित्त मावळात झाला. मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे व अन्य यांच्या पहाडी आवाजात मावळवासीयांनी शिवगिते व भीमगितांचा अविष्कार ऐकायला मिळाला.

मागील काही दिवसांपासून काही दुष्टांद शक्तींमुळे मराठा व दलित समाजात मोठ्या प्रमाणात जातीय तेढ निर्माण झाला आहे. हा तेढ कमी करत जातीय सलोखा राखण्याकरिता व दोन्ही समाजाला एकत्र आणण्याकरिता या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सुनिल शेळके यांनी स‍ंगितले. याकरिता रविवारी दुपारी दोन्ही महापुरुषांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान भगवा व निळा या संयुक्त रंगाचे फेटे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवित होते.

या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते केशवराव वाढेकर, आमदार महेश लांडगे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा वाघ, लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेविका पूजा गायकवाड, सिंधू परदेशी, तसेच राज्यभरातील कला, संस्कृती आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

संपूर्ण शिंदे परिवाराने (प्रसिद्ध गायक) प्रथमच एकत्रित गायनाचा कार्यक्रम केला. त्यामुळे संगीतप्रेमी व मावळवासीयांसाठी हा दुर्मिळ दुग्धशर्करा योग होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या सह बाल गायक आल्हाद शिंदे या संपूर्ण शिंदे कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित सुमधुर गाणी सादर केली. 

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. कार्यक्रमात मिलिंद शिंदे यांनी हंस हा कुणाचा, आले जगी भीमराया, आदर्श शिंदे यांनी माझ्या राजा रं, सोनियाची उगवली सकाळ, देवा तुझ्या गाभा-याला, डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, आनंद शिंदे यांनी दोनच राजे इथे जन्मले, राजा राणीच्या जोडीला यांसारखी बहारदार गाणी सादर केली. सुमारे 25 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Web Title: Shiv Jayanti and Bhim Jayanti Joint Celebration to maintain social reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.