वाघोलीत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:23 PM2021-08-24T20:23:30+5:302021-08-24T20:23:38+5:30
आंदोलनानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वाघोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध व्यक्त करीत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे हवेली तालुक्यातील शिवसैनिकांनी वाघोलीतील केसनंद फाटा येथे दहन केले.
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच नारायण राणे यांच्या विरोधी घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याला महिला शिवसैनिकांनी जोडे मारले. आंदोलनानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना शिवसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके,हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख युवराज दळवी व हवेलीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
''केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्याबाबत असे बेताल वक्तव्य करणे चुकीचे असून राणेंची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. त्यांना अटक करून उपचार केले जाणे गरजेचे आहे. राणेंना पुणे जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही असे यावेळी पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.''