शिवसैनिकांनी निवडणुकांना तयार राहावे: आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:40+5:302021-09-06T04:12:40+5:30
वडगाव काशिंबेग येथे आंबेगाव तालुका शिवसेनेचा मेळावा पार पडला. त्या वेळी आढळराव पाटील बोलत होते. शिवसेना नेते, खासदार संजय ...
वडगाव काशिंबेग येथे आंबेगाव तालुका शिवसेनेचा मेळावा पार पडला. त्या वेळी आढळराव पाटील बोलत होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या वेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, अविनाश रहाणे, सरपंच किरण राजगुरू, सागर काजळे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, कोरोनाकाळात शिवसैनिकांनी मनापासून काम केले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, पतसंस्था, साखर कारखाना, सहकारी सोसायटी यांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. खासदार नसलो तरी एवढीच ताकद सरकार दरबारी आहे. पद नसले तरी फारसा काही फरक पडत नाही व कामे अडत नाही. असे सांगून ते म्हणाले की, राज्यात सूत्रे बदलली आहेत. तेव्हापासून संघर्षापासून काहीसे दूर असलो तरी जेव्हा लढाई, संघर्ष करायची तेव्हा हयगय करत नाही. आगामी निवडणुकात आघाडी वाटाघाटी झाल्या तर ठीक, नाहीतर स्व ताकदीवर लढू, आघाडी नाही झाली तर ताकद दाखवावी लागेल असे स्पष्ट करून आढळराव-पाटील म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत. अधिकाऱ्यांना फोन केला की शिवसैनिकांच्या अन्यायाची दखल लगेच घेतली जाते. निवडणुकीला दिवस कमी असल्याने गावपातळीवरील संस्था, सोसायटी यामध्ये ताकद वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटक उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. या निकालात 2013 साली जी केस मी जिंकलो होतो तिचा दाखला देण्यात आला आहे. निकालात नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर, राजाराम बाणखेले, अशोक बाजारे, तानाजी शेवाळे, सुभाष पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रवींद्र करांजखेले यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश घुले यांनी, तर आभार देविदास दरेकर यांनी मानले.
फोटोखाली: शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील.