पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर शिवसेनेचा माेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 03:28 PM2019-07-17T15:28:33+5:302019-07-17T18:30:12+5:30
पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांच्या विराेधात आज शिवसेनेच्या वतीने धडक माेर्चा काढण्यात आला. पुण्यातील येरवडा भागातील कंपनीत हा माेर्चा काढण्यात आला.
पुणे : पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांच्या विराेधात शिवसेनेने माेर्चा काढला. पुण्यातील येरवडा पाेस्ट ऑफिसपासून काॅमरझाेन आयटी पार्कमध्ये हा माेर्चा नेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित हाेते. त्याचबराेबर शेकडाे कार्यकर्ते या माेर्चात सहभागी झाले.
सध्या शेतकरी दुष्काळात हाेरपळून निघत आहे. अशातच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात येत आहे. त्यामुळे अशा पीक विमा नाकरणाऱ्या कंपन्यांच्या विराेधात शिवसेनेने आज माेर्चा काढला. दुपारी 12 च्या सुमारास पुण्यातील येरवडा पाेस्ट ऑफिसपासून माेर्चाला सुरुवात झाली. या माेर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय हाेती. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. शिवसेनेचा विजय असाे अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच शेतकरी पिक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांचा जाहीर निषेध, शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांनाे खबरदार असे वाक्य लिहीलेले फलक हातात धरण्यात आले हाेते.
घाेषणा देत माेर्चा काॅमरझाेन येथे आला. तेथे आत साेडण्यावरुन पाेलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीकाळ बाचाबाची झाली. आंदाेलकांच्या रेट्यामुळे आयटीपार्कचे दार उघडण्यात आले. आढळराव पाटील, श्रीरंग बारणे यांच्यासाेबत शिष्टमंडळ कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आत गेले. येरवडा ते काॅमरझाेन आयटी पार्कच्या संपूर्ण रस्त्यात फ्लेक्स लावण्यात आले हाेते. एका ट्रॅक्टरमध्ये शेतकरी आत्महत्या करीत असलेला प्रतिकात्मक पुतळा देखील उभारण्यात आला हाेता.