Vikram Gokhale: बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील, भाजपा-सेनेनं एकत्र यायला हवं; विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 03:31 PM2021-11-14T15:31:21+5:302021-11-14T15:31:54+5:30
Vikram Gokhale on Shivsena BJP Alliance: विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुणे-
शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील महाविकास आघाडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांशी बोलणार
"राज्यात जे सुरूय ते योग्य नाही. माझी सखी आत्तेसासू ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती. बाळासाहेब हे माझे मामेसासरे होते. बाळासाहेबांची भाषणं ऐकून गेली ४० वर्ष महाराष्ट्र तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणामध्ये जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत. ते पाहून खरंतर मराठी माणूस भरडला जातोय. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की सरकारचं हे गणित चुकलेलं आहे", असं विक्रम गोखले म्हणाले.
"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले.
शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांना मी स्वत: प्रश्न विचारलेले आहेत की अडीच वर्ष दिली असती तर तुमचं काय बिघडलं असतं किंवा शिवसेनेचं काय बिघडलं असतं? हे माझे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेऊन याबाबत नक्कीच बोलेन. कारण भाजपा-शिवसेना एकत्र यायलाच हवेत. तेच देशासाठी चांगलं आहे, असं ठाम मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.