पुण्यात शिवसैनिकांचा जल्लाेष ! अलका चाैकात उधळला गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:30 PM2019-11-27T19:30:07+5:302019-11-27T19:39:06+5:30
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड झाल्याने पुण्यात शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.
पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाशिवआघाडीचे सरकार येणार हे पक्के झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. यामुळे ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राज्याच्या सर्वाेच्च स्थानी बसणार आहे. याचा आनंद आज शिवसैनिकांनी पुण्यातील अलका चाैकात गुलाल उधळत आणि लाडू वाटत साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार केला. तसेच काेण आला रे काेण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घाेषणा देखील यावेळी देण्यात आल्या.
भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षाच्या मुख्यंमत्री पदाचा शब्द पाळला नाही असा आराेप करत शिवसेनेने भाजपासाेबतची आपली युती ताेडली. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेससाेबत शिवसेनेने आघाडी करत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाची चर्चा शेवटच्या टप्प्यात असताना अजित पवार यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याविराेधात हे तिनही पक्ष सर्वाेच्च न्यायालयात गेले. काल दुपारी अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन हाेणार हे निश्चित झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घाेषित करण्यात आले.
आज संध्याकाळी चारच्या सुमारास शिवसैनिकांनी अलका चाैकात जल्लाेष केला. गुलाल उधळत, लाडू वाटून आपला आनंद साजरा केला. यावेळी बॅन्डच्या तालावर शिवसैनिकांनी ठेका धरला. यावेळी बाेलताना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेलं वचन आज पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक आनंदात आहाेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं हे सरकार असणार आहे. भाजपने पुण्यात शिवसेना संपविण्याचे काम केले परंतु शिवसेना ही न संपणारी आहे. येणाऱ्या काळात पुण्यावर देखील शिवसेनेची सत्ता असेल.