"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत; खेडचे शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 08:41 PM2022-07-18T20:41:33+5:302022-07-18T20:41:51+5:30
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सामील झाल्यावर शिवसैनिकांमध्ये चलबिचल
चाकण : शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. परंतु खेड तालुक्यातील एकही शिवसैनिक आणि पदाधिकारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रामाणिक राहील अशी माहिती पुणे जिल्हा उपनेते अशोक खांडेभराड आणि तालुकाप्रमुख रामदास धनवटे लोकमतशी बोलताना दिली.
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेले आढळराव पाटील यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक पुरते हादरून गेले आहेत. याबाबत पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख अशोक खांडेभराड आणि खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी आमदार
सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी सांगितले की, एकही शिवसैनिक आढळराव पाटील यांच्या सोबत जाणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खेड तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी राहणार आहेत. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. शिरूर मतदार संघासह खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर,लांडेवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी जाऊ नये असे आवाहन सह संपर्कप्रमुख खांडेभराड यांनी केले आहे.