शिवाजीनगरवर शिवसेनेचा दावा ? विनायक निम्हण सक्रीय झाल्याने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 07:00 AM2019-09-18T07:00:00+5:302019-09-18T07:00:03+5:30
शिवसेनेने शिवाजीनगरची मागणी केली आहे़...दुसरीकडे भाजपामध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्यासह इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे़.
पुणे : भाजपा, शिवसेनेला कायम साथ देणारा म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो़.. भाजपामध्ये इच्छुकांची झालेली भाऊ गर्दी आणि त्याचवेळी शिवसेनेने पुणे शहरातील दोन विधानसभेवर दावा केला आहे़.. त्याचवेळी गेली दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार विनायक निम्हण यांनी वाढदिवसानिमित्त पुन्हा सक्रीय झाले आहेत़. त्यामुळे शिवाजीनगर शिवसेनेच्या वाटेला जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे़.
विनायक निम्हण हे काँग्रेसमध्ये असताना शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचा पंजा विजयी झाला होता़. तो अपवाद वगळता येथे शिवसेना आणि भाजपालाच कायम विधानसभा आणि लोकसभेत भक्कम आघाडी मिळत आली आहे़. भाजपाचे विद्यमान आमदार विजय काळे यांनी २०१४ मध्ये २२ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला होता़. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी शिवाजीनगरमधून मिळाली होती़. त्यामुळे युतीमध्ये ही विधानसभा भाजपाच्याच वाट्याला राहते की शिवसेनेला दिली जाते, याविषयी मतदारसंघात उत्सुकता आहे़.
शिवसेनेने शिवाजीनगरची मागणी केली आहे़. त्याचवेळी विनायक निम्हण यांनी मतदारसंघात वाढदिवसांचे निमित्त साधून विविध कार्यक्रम घेऊन जनसंपर्क सुुरु केला़. शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही शिवाजीनगर मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे़.
दुसरीकडे भाजपामध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्यासह इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे़. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे, निलिमा खाडे, दत्तात्रय खाडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत़. या मतदारसंघात तब्बल ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत़. त्यामुळे विद्यमान आमदारांना रिपिट करायचे की शिवसेनेला हा मतदारसंघ सोडायचा असा प्रश्न भाजपापुढे आहे़. काँग्रेसकडून मनिष आनंद हे यांनी गेल्या वषीर्पासूनच तयारी सुरु केली आहे़. शिवाजीनगरमधून काँग्रेसकडून अनेक इच्छुक असले तरी मनिष आनंद याची तयारी पाहता कॉंग्रेसमध्ये त्यांचे पारडे जड आहे़. याअगोदर येथून कोणाला तिकीट मिळणार अशा चर्चेची जागा आता युतीत ही जागा कोणाला सुटणार अशी चर्चा रंगू लागली आहे़.