पुणे महापालिकेच्या आर्थिक पतनास भाजपाच जबाबादार : शिवसेनेची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:32 PM2018-01-24T18:32:37+5:302018-01-24T18:37:58+5:30
पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्यास राज्य सरकारचा कारभारच जबाबदार असल्याची बोचरी टीका पुण्यात शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.
पुणे : महापालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्यास राज्य सरकारचा कारभारच जबाबदार असल्याची बोचरी टीका पुण्यात शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.
शहर संपर्कप्रमुख श्याम देशपांडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच सरकारने बेजबाबदारपणे बंद केले, असे ते म्हणाले. जीएसटी अनुदान, बांधकाम विकास शुल्क व मिळकत कर या तिनही प्रमूख गोष्टींवर सरकारने विविध नियम करून घाला घातला. मुख्य सभेने सर्वसंमतीने केलेले अनेक नियम सरकारने बदलले. त्याचा परिणाम काय होईल, याचा विचार केला नाही. स्थानिक कारभाऱ्यांना समज नाही. त्यामुळे चुकीच्या योजनांवर वारेमाप खर्च व नागरी समस्यांकडे दुर्लक्ष सुरू असल्याचे देशपांडे म्हणाले.
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
तुम्ही कोथरूड विधानसभा मतदार संघ लढवणार का, असे विचारल्यावर देशपांडे यांनी का नाही असा प्रश्न केला. राजकारण घरी बसण्यासाठी करतात का, असा प्रतिप्रश्न करून त्यांनी पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर नक्की लढणार, असे सांगितले. शिवसेनेची शहरात अडीच ते तीन लाख पक्की मते असल्याचा दावा त्यांनी केला. यात वाढच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.