शिवसेनेला हव्यात पुण्यातील तीन जागा : पक्षप्रमुखांना सांगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 08:07 PM2019-03-14T20:07:16+5:302019-03-14T20:09:06+5:30
लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत.
पुणे : लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत. पक्षप्रमुखांकडे तशी मागणीच करण्यात येणार असून त्यासाठी संयुक्त बैठकीचा मुहुर्त पुण्यातील प्रमुख शिवसैनिकांनी धरला असल्याची माहिती मिळाली. आधी तसा शब्द घ्यावा असे सांगण्यात येणार असल्याचे समजते.
लोकसभेची सन २०१४ ची निवडणूक भाजपासेनेने संयुक्तपणे लढली. त्यात भाजपाला मोठा विजय मिळाला. सव्वातीन लाखांच्या फरकाने भाजपाने काँग्रेसवर विजय मिळवला. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. मात्र त्यानंतर विधानसभेला भाजपाने युती तोडली. त्यामुळे शिवसेनेला स्वतंत्रपणे लढावे लागले. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजपाने वर्चस्व मिळवले. मात्र हडपसर, कोथरूड, वडगावशेरी, पर्वती या चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमाकांवर होती. त्यामुळेच आता लोकसभेला युती आहे तर त्याचवेळी विधानसभांचे वाटपही निश्चित करून घ्यावे असे बहुसंख्य शिवसैनिकांचे मत आहे.
कोणते मतदार संघ मागायचे यावर सध्या एकमत नसले तरी तो आपला प्रश्न आहे, आपल्या स्तरावर मिटवता येईल, पण त्यांच्याकडून तीन विधानसभा मतदारसंघांचा शब्द घ्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यातही कोथरूड व शिवाजीनगरबाबत शिवसैनिक आग्रही आहेत, कारण या दोन्ही मतदारसंघावर त्यांच्याच झेंडा होता. मात्र संघाने तिथे मुसंडी मारल्यामुळे अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यानंतर गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी असेल तर कसबा किंवा वडगाव शेरी मतदारसंघ मागावा असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
भाजपाकडून त्यांच्या निवडणूकीच्या वेळेस काम करून घेतले जाते, त्यानंतर शिवसेनेची वेळ असेल त्यावेळी मात्र फसवले जाते अशी तक्रारही शिवसेनेत कायम करण्यात येत असते. शिवसेनेचा उमेदवार असेल त्या मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तिथेच काम करणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र ते जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथे जाऊन काम करतात व त्याचा फटका मतदानाला बसतो असे काही शिवसैनिकांनी सांगितले. संयुक्त बैठकीत हाही मुद्दा उपस्थित करण्याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे शिवसैनिक आग्रह धरत आहेत.
................
आपले किमान तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात येणार आहेत, याची भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही जाणीव आहे. कोणते मतदारसंघ याबाबत मात्र ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार चिंतीत आहेत. त्यातही शहराच्या मध्यभागातील आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल किंवा नाही याची धास्ती वाटते आहे.