शिवसेनेला हवे फिफ्टी-फिफ्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:44 PM2019-04-03T23:44:03+5:302019-04-03T23:44:26+5:30

प्रचारात सक्रिय : भाजप आमदारांच्या पोटात गोळा

Shiv Sena needs Fifty-Fifty | शिवसेनेला हवे फिफ्टी-फिफ्टी

शिवसेनेला हवे फिफ्टी-फिफ्टी

Next

पुणे : आम्ही मन लावून प्रचार करतो आहोत, मात्र विधानसभेला आम्हाला फिप्टी-फिप्टी जागा हव्यात अशी मागणी शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे होत आहे. तशी तडजोड झाल्यामुळेच भाजपा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारात शिवसेना सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या या सक्रियेतने भाजपा आमदारांच्या मात्र पोटात गोळा आला आहे.

विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शहरात शिवसेनेला पुरते अस्मान दाखवले आहे. विधानसभेला युती तुटली. त्यावेळी भाजपाने शहरातील सहा व हडपसर तसेच खडकवासला हे अनुक्रमे शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडलेले अशा एकूण मतदारसंघात बाजी मारली. सर्वच जागांवर भाजपाचेच आमदार निवडून आल्यामुळे शिवसेनेचे राजकीय अस्तित्वच संपले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत तर भाजपाने कमालच केली. ९८ जागा जिंकत त्यांनी महापालिकेत एकहाती सत्ता
मिळवली त्यावेळी शिवसेनेचे कसेबसे ९ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेला अजूनतरी मान वर काढणे जमलेले नाही.
लोकसभेसाठी युती झाल्यामुळे त्यांना आती ती संधी मिळाली आहे. मागील विधानसभेत सर्व जागा भाजपाने मिळवल्या असल्या तरी पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. त्यात कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला व पर्वती या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळेच युती झाल्यानंतर शहर स्तरावर झालेल्या प्राथमिक बैठकीतच शिवसेना नेतृत्वाने फिप्टी-फिप्टीची मागणी केली. कोथरूड हा तर शिवसेनेचाच मतदारसंघ आहे, त्यानंतर पर्वती व आता गिरीश बापट लोकसभेवर चालल्याने रिकामा झाला तर कसबा विधानसभा मतदार संघ हे शहरातील तीन व एक बाहेरचा म्हणून खडकवासला किंवा वडगाव शेरी अशा चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला असल्याची माहिती मिळाली. याबाबत भाजपाच्या वरिष्ठांना त्यांना काही सांगितले असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश बापट यांच्या प्रचारात माजी आमदार असलेले चंद्रकात मोकाटे व महादेव बाबर हे शिवसेनेचे दोन्ही शहरप्रमुख सक्रिय झालेले दिसत आहेत. मोकाटे यांनी मध्यवर्ती संपर्क कार्यालयासाठी कोथरूड येथील आपली जागा देऊ केली आहे. त्याशिवाय शहरामध्ये शिवसैनिकांच्या विभागनिहाय बैठका घेत त्यांनी स्थानिक प्रचारात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांना केले आहे. एकही शिवसैनिक तुम्हाला मागे दिसणार नाही असे त्यांनी जाहीरपणे बापट तसेच भाजपा श्रेष्ठींना सांगितले आहे.
शिवसेनेच्या या सक्रियतेने भाजपाच्या विद्यमान आमदारांच्या पोटात मात्र गोळा आला आहे. कोणाला थांबावे लागले याची चर्चा त्यांच्यात सुरू आहे. त्यांचे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारीही त्यामुळे अस्वस्थ आहेत. कोथरूडच्या मेधा कुलकर्णी, पर्वतीच्या माधुरी मिसाळ, हडपसरचे योगेश टिळेकर व खडवासल्याचे भीमराव तापकीर हे सध्या तरी डेंजर झोनमध्ये असल्याचेसांगितले जात आहे.भाजपातील शिस्त लक्षात घेता पक्षाने निर्णय घेतला तर काहीही करता येणार नाही हे या आमदारांनाही माहिती आहे. त्यामुळेच त्यांची चिंता वाढली आहे.

अंतर्गत स्पर्धा
च्शिवसेनेच्या या भीतीशिवाय भाजपातंर्गतही बरीच स्पर्धा आहे. पर्वती, कोथरूड मधून अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. बापट लोकसभेवर गेल्यास कसबा मतदारसंघ मोकळा होत असल्याने त्यावरही अनेकांचा आतापासूनच डोळा आहे.

Web Title: Shiv Sena needs Fifty-Fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.