खेड पंचायत समितीत शिवसेनेमध्ये 'खेचाखेची'चं राजकारण ; सभापती विरोधात फडकवलं बंडाचं निशाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:44 PM2021-05-25T20:44:03+5:302021-05-25T20:52:11+5:30
सर्व पक्षीयांनी दाखल केला अविश्वास ठराव
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. कोरोनाच्या काळातही शिवसेना सदस्यांमध्येच पदासाठी 'खेचाखेची’ सुरू झाल्याने तालुक्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दि. (दि३१) सदस्यांची विशेष सभा बोलविली आहे.
खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे.त्यांचे ८ सदस्य आहेत.तर कॉंग्रेस,भाजप असा प्रत्येकी एक मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बलाबल आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत.सभापती पद सर्वसाधारण वर्गासाठी असून शिवसेनेच्या पद न मिळालेल्या सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. सदस्यांमध्ये आपसात ठरल्याप्रमाणे सर्वाना संधी मिळाली पाहिजे असा दावा इच्छुकांनी बोलून दाखवला असून त्यासाठी हा अविश्वास दाखल केला आहे असे सांगितले. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला ९ महिने बाकी असल्याने पद मिळवण्याची शर्यत व चुरस निर्माण झाली आहे.मागील सभापती,उपसभापती निवडणुकांमध्ये सुध्दा शिवसेनेत मतभेद असल्याचे पाहायला मिळाले.सभागृहातील राष्ट्रवादी क्रांग्रेसच्या चार सदस्याची मदत घेऊन काहीनी पदाची माळ गळ्यात मारून घेतली. शिवसेनेच्या सभागृहातील सदस्यांवर पक्षीय नेत्यांचा वचक राहिलेला नसल्याचे यावरून बोलले जाते.समितीतील सर्व पक्षीय १४ पैकी ११ सदस्यांनी व शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याचे सांगितले जात असून यामध्ये राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा सहभाग आहे.सभापती पदाच्या इच्छुक सुनीता सांडभोर यांनी हा ठराव प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, गटविकास अधिकारी अजय दाखल केल्याचे सांगितले.तर सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे आपण यापूर्वीच राजीनामा दिला आहे असे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले.
.............................
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही.अनेकजण उपचार घेत आहेत.अनेकांचा बळी गेला आहे..तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर घोंगावत आहे.नुकत्याच झालेल्या चक्री वादळाने अनेकांचे संसार उघड्यावर आले.लॉकडाउन मध्ये सर्वसामान्याचे रोजगार बुडाले.व्यवसाय थांबले.तालुक्यातील अनेक गावे,वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई आहे.हे सारे बाजूला ठेऊन पदासाठी पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांनी संगीत खुर्चीचा खेळ सुरु केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
......................