'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:59 PM2023-02-20T14:59:36+5:302023-02-20T14:59:47+5:30
'राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला'
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल आहे. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'सगळं चोरलं पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ? 'आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत' असा मजकूर उद्धव ठाकरें यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलेक्सवर लिहला आहे. तर शिंदे गटाने लावलेल्या फलेक्सवर 'राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला' अशा स्वरूपाचा मजकूर लिहण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवेसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. त्यावर निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर धनकवडी भागात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ धनकवडीमध्ये पोस्टर झळकले होते. 'आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत' सगळं चोरलं पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ? असा सवाल या पोस्टरवर करण्यात आला होता.
शिंदे गटाकडून शहरातील पाच चौकामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे स्वर्गातून आशीर्वाद देत असल्याचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला अशा स्वरूपाचा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.