Vijay Shivtare: तेवढी त्यांची ताकद नाही; अजित पवारांवर शिवतारेंचा हल्लाबोल, शिंदेंविषयी काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:38 IST2024-12-18T17:35:45+5:302024-12-18T17:38:53+5:30
आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता.

Vijay Shivtare: तेवढी त्यांची ताकद नाही; अजित पवारांवर शिवतारेंचा हल्लाबोल, शिंदेंविषयी काय म्हणाले?
Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचाही विस्तार झाला असून सत्ताधारी महायुतीतील विविध नेत्यांनी जाहीरपणे आपल्याच पक्षाविरोधात हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता. मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर आता विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली असून त्यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा राग शांत झाल्याचं दिसत आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.
"दोन दिवस आधी मला मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना दिली असती तर काहीच वाटलं नसतं. पण माझे सर्व कुटुंबीय आले होते. सोबतच मतदारसंघातील कार्यकर्ते ३०० हून अधिक गाड्या घेऊन नागपूरला आले होते. या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता होती. मला वैयक्तिक हितासाठी मंत्रिपद नको होते, तर राज्याच्या विकासात योगदान देण्याची माझी क्षमता आहे आणि त्यासाठी मंत्रिपद मिळावं, अशी माझी इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. मी आता सर्व कार्यकर्त्यांना समजावलं आहे. शेवटी मी शिवसेना हे माझं कुटुंब समजतो," असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्याविषयी नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांविषयी काय म्हणाले विजय शिवतारे?
तुमचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, असा प्रश्न पत्रकारांकडून विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर "अजित पवार यांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत," असं शिवतारे म्हणाले. तसंच अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राचा बिहार झाला, शिवतारे काय म्हणाले होते?
"महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे," असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर केला होता. "मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.