शिवसेना वि. राष्ट्रवादी?; आंबिल ओढा कारवाईवरून तापलं राजकारण; भाजपानं जोडलं 'दादां'शी कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:58+5:302021-06-26T04:09:58+5:30
आंबिल ओढ्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्टीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. नागरिकांचा विरोध असताना ही कारवाई केली जात होती. कोर्टाने या ...
आंबिल ओढ्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्टीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. नागरिकांचा विरोध असताना ही कारवाई केली जात होती. कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिल्यानंतर दुपारी ही कारवाई थांबवण्यात आली. मात्र या प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या कारवाईवरून काल विरोधी पक्षांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली होती.
मात्र आता या संपूर्ण कारवाईमागे राष्ट्रवादीमधील एका पालक असणाऱ्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोप होतो आहे. या नेत्याचा आदेशामुळेच ही कारवाई झाली असा दावा केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेने मात्र या कारवाईला थेट विरोध केला आहे. विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गेल्या आठवड्यात या विषयाबाबत बैठकदेखील घेतली होती. १५ जुलैपर्यंत इथे कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या कारवाईमागे नक्की कोण याची चर्चा आता रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोरोना आढावा बैठकीला येणं टाळलं, त्यामागेदेखील हेच कारण असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. सुळे म्हणाल्या, "अजित पवार आजच्या बैठकीला नसणार हे १० दिवसांपूर्वीच माहीत होतं. राज्यातील मंत्र्याने ही कारवाई करण्यासाठी दबाव टाकला हे कसे शक्य आहे?"