पीक विमा वेळेत न दिल्याने पुण्यात विमा कंपनीच्या ऑफिसची शिवसैनिकांनी केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 12:33 PM2019-11-06T12:33:15+5:302019-11-06T12:34:11+5:30
शिवसैनिकांनी पुण्यातील विमा कंपनीची केली तोडफोड ; पीकविमा देत नसल्याने केला राग व्यक्त
पुणे : शेतकरी आत्महत्या करत असताना पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा देत नसल्याने शिवसैनिकांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीची तोडफोड केली. ही सुरवात आहे पिच्चर अजून बाकी आहे अश्या शब्दात शिवसैनिकांनी विमा कंपन्यांना इशारा दिला.
राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असला तरी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीकविमा दिला जात नाही. त्यामुळे कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा द्यावा या मागणीसाठी शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडत आंदोलन केले.
शिवसैनिक सुरज लोखंडे म्हणाला, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि विमा कंपन्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ही कंपनी फोडली हा एक विमा कंपन्यांना इशारा आहे, त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे द्यावेत अन्यथा राज्यातील इतर कंपन्या देखील फोडण्यात येतील. याची सुरुवात पुण्यातुन झाली आहे. हा केवळ टायटल आहे पिच्चर अजून बाकी आहे.