किल्ले सिंहगडावर साकारणार शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:44+5:302021-09-07T04:15:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगडावर अंदाजे सात कोटी रुपये खर्चून भव्य विश्रामगृह उभारण्यासोबत शिवसृष्टी साकारण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगडावर अंदाजे सात कोटी रुपये खर्चून भव्य विश्रामगृह उभारण्यासोबत शिवसृष्टी साकारण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आहे. या आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यात त्यांनी काही सूचना केल्या असून, त्या दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. शूरवीर तानाजी मालसुरे यांच्या आठवणी जिवंत करणाऱ्या सिंहगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या सुमारे ४४ हजार चाैरस फूट जागेवर ही शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. या जागेवर ३०४.४६ चौरस क्षेत्रावर १९१३ झाली बांधकाम केलेले विश्रामगृह आहे. हे विश्रामगृह मोडकळीस आले आहे. त्यानंतर १९९८ साली जिल्हा परिषदेने १३१.८४ क्षेत्रावर नवीन विश्रामगृह उभारले. तेही फारसे वापरले जात नाही. या ठिकाणी नवे विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे. प्राथमिक स्तरावर तयार आराखड्यात तळमजला आणि पहिला मजला अशा २ हजार २७५.७० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. किल्ल्यावरील ही जुनी इमारत पाडून तेथे केल्या जाणाऱ्या पुनर्विकासात शनिवारवाडा, विश्रामबागवाड्याच्या वास्तुरचनेचे दर्शन घडविणारी इमारत बांधण्याचा प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. इतिहासकार, वास्तुरचनाकार, पर्यटन, वन, तसेच महत्त्वाच्या विभागांची मते जाणून घेतल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम केला जाणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्यापुढे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या किल्ल्यावरील जागेचा पुनर्विकास करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला आहे. सध्या असलेल्या इमारतीत व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. या जागेचा पुनर्विकास झाल्यास सिंहगड किल्ल्यावर संस्कृतीचे दर्शन घडावे तसेच शिवशाही काळातील वास्तुरचना, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारवाड्यासह विश्रामबागवाड्याच्या प्रतिकृतीचा काही भाग या पुनर्विकासामध्ये प्रत्यक्षात साकारण्याचा प्राथमिक प्रस्तावात विचार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
चौकट
सिंहगड हा डोंगरी किल्ला असून, त्याला विशेष भौगोलिक स्थान आहे. त्याला कुठेही धक्का न लावता विश्रामगृह उभारले जाणार आहे. त्यासाठी इतिहासकार आणि लोकप्रतिनिधींकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे.
कोट
सिंहगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या जागेचा पुनर्विकासाचा प्रस्ताव पालकमंत्र्यांपुढे सादर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, इतिहासकार, वास्तुरचनाकार आणि अभ्यासकांची मते घेऊन प्रस्ताव अंतिम करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
------------