सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 04:53 PM2023-12-20T16:53:31+5:302023-12-20T16:53:49+5:30

प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्णकंकण अर्पण

Shiva Charitra is the way to get rid of all troubles; said that Minister Sudhir Mungantiwar | सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार

सर्व संकटांतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र- मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे:  प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल पुण्यातील नातूबाग मैदानात सांस्कृतिक कार्य आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सुवर्णकंकण अर्पण करून सत्कार करण्यात आला. 'हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने' यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना निवृत्त एअर मार्शल श्री जयंत इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रतापगड उत्सव समितीतर्फे झालेल्या या हृद्य सत्कार समारंभास पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांच्या प्रेमाचे ऋण हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन केले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखे लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल, याचाही पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला. 

प्रतापगड उत्सव समितीने केलेल्या या सत्काराला उत्तर देतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्यावरील टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी  २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ टपाल तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक महोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्याचे चलन असलेले "होन" रीझर्व बँकेच्या माध्यमातून पुन: प्रकाशित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात गतवर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली, तो अभिमानाचा क्षण होता असेही मुनगंटीवार म्हणाले. 

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री मुनगंटीवार म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावा, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या नंतरही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही. काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांच्या याच अलौकिक कार्याची प्रेरणा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देत त्यांच्यासाठी ऊर्जादायी ठरेल, असे ते म्हणाले.  यादेशात केवळ विजेता किंवा धनवान हा आदर्श असत नाही तर या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई हेच आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते मंत्री मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

Web Title: Shiva Charitra is the way to get rid of all troubles; said that Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.