सलग सात दिवस रक्तदान शिबिर घेऊन शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:21+5:302021-02-25T04:12:21+5:30
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील तरुण भूषण सुर्वे याने तालुक्यातील तरुणांना एकत्र करून सूर केलेल्या श्री शिवशंभू चॅरिटेबल ...
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील तरुण भूषण सुर्वे याने तालुक्यातील तरुणांना एकत्र करून सूर केलेल्या श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचा वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सलग सात दिवस रक्तदान शिबिर घेवून शिवजयंती सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये आठ दिवसांत तब्बल २२२२ रक्त बाटली संकलन करण्यात आले.
राज्यात पुणे, सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात एकूण २५ गावांमध्ये छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्ताने दि. १४ ते २२ फेब्रुवारी या सप्ताहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास २६०० तरुणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण २२२२ रक्तदाते रक्तदानास पात्र ठरले, अशी माहिती श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी दिली.
महाराष्ट्रामधील विविध भागात रक्तसंकलन करण्यासाठी गणपतराव आवटे फाउंडेशन, अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, अखिल शिवजयंती उत्सव कळंब, शिवयुग प्रतिष्ठान, महाराज प्रतिष्ठान, संजयभाऊ सोनवणे मित्र परिवार, अखिल करमाळा शहर शिवजयंती उत्सव तसेच अक्षय ब्लड बँक, पुणे, सातारा, सोलापूर, पुणे ब्लड बँक, हडपसर, सिद्धेश्वर ब्लड बँक, पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर, सोलापूर, मेडिकेअर ब्लड बँक, सोलापूर, बीड ब्लड बँक, बीड, जीवनदायी ब्लड बँक बीड यांनी सहकार्य केले.
गरजूवंत रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणार
राज्यातील विविध ठिकाणी दररोज शेकडो बॉटल रक्तबॉटलची आवश्यकता भासत असते, त्यामुळे अनेक गोरगरीब रुग्ण रक्त उपलब्ध होत नसल्याने मृत्यू पावतात. मात्र श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करणारा असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी सांगितले.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते.