आढळराव पाटील म्हणाले, "मी शिवसेनेतच, सावरायला मला काही दिवस जातील..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:53 PM2022-07-04T14:53:14+5:302022-07-04T15:17:18+5:30
त्यांना धक्का बसल्याचेही पाटील म्हणाले...
मंचर (पुणे): मी शिवसेनेतच आहे , पण मी खूप दु:खी झालो आहे, पक्षाने असे करायला नको पाहिजे होते, अनावधानाने झाले की कसे हे मला माहिती नाही पण, अठरा वर्ष या जिल्ह्यात एक हाती पक्ष टिकून ठेवलाय. प्रामाणिक एकनिष्ठ राहून पक्षाने असे करणे मला आवडलं नाही. पक्षाने कारवाई मागे घेतली असली तरी यातून सावरायला मला काही दिवस जातील, अशी भूमिका शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांडली.
शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याच्या बातम्या सकाळी पसरल्या. त्यानंतर काही तासातच शिवसेना पक्षाने ही कारवाई मागे घेत आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई मागे घेतली जात आहे. ते पक्षाचे उपनेते आहेत व पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
रात्री साडेदहा वाजता उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. मतदार संघातील काही पदाधिकारी आपल्याला भेटायला येणार आहे. रविवारी माझा जनता दरबार असल्याने मी मंगळवारी आपल्याला भेटायला येतो असे बोलणे झाले. आणि रविवारी सकाळी उठून पेपर पाहिल्यावर मला माझी हकालपट्टी झाल्याचे समजले. रात्री बोलताना उद्धव साहेब म्हणाले, गेली अठरा वर्षात आढळराव इकडे जाणार तिकडे जाणार अशा चर्चा खूप वेळा उठल्या. पण तुम्ही कुठेच गेला नाहीत. पण जे कधीच जाणार नाहीत याची खात्री होती. ते लोक गेले त्याचे दु:ख आहे. आढळराव पाटील तुमच्यावर विश्वास आहे, असे ते म्हणाले. आणि सकाळी हकालपट्टीची बातमी वाचायला मिळाली. मलाच फार आश्चर्य वाटलं.
माझी चूक एकच झाली मी एकनाथ शिंदेंची अभिनंदनाची पोस्ट टाकली, पण पोस्ट टाकून चुकीचे काही केले असे मला वाटत नाही. राज्यभर किती जणांनी अभिनंदनाच्या पोस्ट केल्यात पण कारवाई फक्त माझ्यावरच. मी माझं सगळं सोडून शिवसेना व शिवसैनिकांसाठी रात्र- दिवस प्रामाणिकपणे काम करतोय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी एकटा संघर्ष करतोय, त्याचेच फळ आज भोगतोय असं वाटतंय. मला फार वाईट वाटलंय.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही सकाळी फोन आला होता. त्यांनीही ही अनावधानाने चूक झाली आहे. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मुंबईला या आपण बोलू असे म्हटले आहे. पण मला खूप वाईट वाटलंय. यातून सावरायला दोन ते तीन दिवस जातील, यानंतर उद्धव ठाकरेंना भेटेल. मी आजही शिवसैनिकांबरोबरच आहे, कार्यकर्त्यांनी शांत रहावे, कोणतेही चुकीचे मत व्यक्त करू नका असे आवाहन त्यांनी केले.