"झालं गेलं विसरून पुन्हा पक्ष वाढीसाठी काम करणार..." आढळराव पाटील, उद्धव ठाकरेंची अखेर भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 10:00 PM2022-07-05T22:00:19+5:302022-07-05T22:06:09+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार शिरूर मतदारसंघाचा लवकरच दौरा...

Shivaji Adhalrao Patil Uddhav Thackeray's meeting Forgetting what happened the party will work continue | "झालं गेलं विसरून पुन्हा पक्ष वाढीसाठी काम करणार..." आढळराव पाटील, उद्धव ठाकरेंची अखेर भेट

"झालं गेलं विसरून पुन्हा पक्ष वाढीसाठी काम करणार..." आढळराव पाटील, उद्धव ठाकरेंची अखेर भेट

Next

मंचर (पुणे) : आपल्यावरील कारवाई नजरचुकीने झाली आहे. त्याबाबत पक्षाने दिलगिरी व्यक्त केली आहे. पक्षासाठी व मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जोमाने कामाला लागावे. शिरूर मतदारसंघाचा मी लवकरच दौरा करणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटीदरम्यान आढळराव पाटील यांना सांगितले.

शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आले होते. मात्र काही वेळातच नजरचुकीने हे घडल्याचे शिवसेना पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी मंगळवारी ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी आढळराव पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मागील १८ वर्षापासून मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. पंधरा वर्षे खासदार असताना माझ्यावर एकही काळा डाग नाही. मात्र घडल्या प्रकाराने मी बेचैन झालो आहे. व्यवसाय, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मी शिवसेना पक्षाच्या वाढीकडे तसेच जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे. मतदारसंघातील आमदार, खासदार हे राष्ट्रवादीचे आहेत. असे असतानाही मी एकटाच पक्षाच्यावतीने लढा देतोय. मी मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करतोय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तोडून इथून पुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढा, असा आग्रह आढळराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी तोडून स्वबळावर लढा तरच शिवसेना जागेवर राहील, अन्यथा अडचण होईल, असे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी सांगितले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवसेनेचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे. विशेषत: कोरोना काळात आपल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही आपण मदतीला धावून गेलात. त्यामुळे झाले गेले विसरून पुन्हा जोमाने काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रयत्न करून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा. शिरूर मतदारसंघात लवकरच दौरा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजीमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

 

Web Title: Shivaji Adhalrao Patil Uddhav Thackeray's meeting Forgetting what happened the party will work continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.