शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास ९० वर्षे पूर्ण
By Admin | Published: June 20, 2017 07:12 AM2017-06-20T07:12:24+5:302017-06-20T07:12:24+5:30
राजर्षी शाहूमहाराज यांच्या पुढाकारातून देशात सर्वप्रथम पुण्यात उभारल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीस नुकतीच ९०
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजर्षी शाहूमहाराज यांच्या पुढाकारातून देशात सर्वप्रथम पुण्यात उभारल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीस नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली. महायुद्धात मराठ्यांनी गाजविलेल्या शौर्याची स्मृती म्हणून छत्रपतींचे हे स्मारक शिवाजीनगर येथील एसएसपीएमएसच्या आवारात उभे केले गेले आहे.
१६ जून १९२७ रोजी या स्मारकाच्या उभारणीस सुरुवात झाली. पायाभरणी समारंभ ब्रिटनचे युवराज प्रिन्स वेल्स यांच्या हस्ते झाला. शाहूमहाराजांनी युवराजांना खास निमंत्रित केले होते. हा पुतळा रेल्वेने मुंबईहून पुण्यात आणण्यात आला. स्मारकाच्या उभारणीसाठी लाखो पुणेकरांनी गर्दी केली होती. या स्मारकासाठी इंदूर संस्थानचे महाराज तुकोजीराव होळकर यांनी आर्थिक पाठबळ दिले होते. देशातील हा शिवाजीमहाराजांचा पहिलाच अश्वारूढ पुतळा आहे.
या स्मारकाच्या ९०व्या स्मृतिनिमित्ताने मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी शाहूमहाराज यांनी छत्रपतींचा पुतळा कसा तयार करून घेतला, या समारंभास कसा विरोध झाला, तो धुडकावून शाहूमहाराजांनी हा समारंभ कसा थाटात केला याचा इतिहास कथन केला.