एल्गार परिषदेच्या गुन्ह्याच्या तपासाची शिवाजी पवारांवर पूर्ण वेळ जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:26 PM2018-09-02T14:26:20+5:302018-09-02T14:26:34+5:30
स्वारगेट सहायक आयुक्तपदी रवींद्र रसाळ यांची नियुक्ती : पोलीस आयुक्तांचे आदेश
पुणे : एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याच्या तपासासाठी पूर्ण वेळ पोलीस अधिकारी देण्याचा निर्णय शहर पोलीस दलाने घेतला आहे. या गुन्ह्यांचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना पूर्ण वेळ तपास करण्यासाठी इतर कामातून मोकळीक दिली आहे. त्यांच्या जागी स्वारगेट सहायक आयुक्तपदी विशेष शाखेचे रवींद्र रसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करत असताना एल्गार परिषदेच्या आडून शहरात माओवादी विचार पसरविण्याचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले. परिषदेच्या आयोजनासाठी माओवादी संघटनांकडून पैसा पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी सुरुवातीला पुणे पोलिसांनी देशभरातील विविध शहरात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन जून मध्ये नागपूर, मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे घालून पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात यामागील देशव्यापी कट पुढे आला. राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, ई मेल, पेनड्रॉईव्ह, हार्ड डिक्स जप्त केल्या आहेत. बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संपर्क करताना त्यांच्या थिंक टँकने कोड लॅग्वेजचा वापर केला आहे़ त्याशिवाय नुकताच अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे या न्यायालयातील तारखांना उपस्थित राहण्यासाठी पोलीस अधिका-यांना जावे लागणार आहे़ त्यामुळे या गुन्ह्याचा तपास बारकाईने व्हावा, यासाठी शिवाजी पवार यांना त्यांच्या कडील इतर जबाबदा-या काढून घेण्यात आली आहे. त्यांना पूर्ण वेळ या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.