गणेश जयंतीनिमित्त शिवाजी रस्ता आज वाहतुकीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:17+5:302021-02-15T04:12:17+5:30
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (१५ फेब्रुवारी) शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता ...
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (१५ फेब्रुवारी) शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्ता या मार्गाचा वापर करावा. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने झाशीच्या राणी चौकातून इच्छित स्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हमजेखान चौकातून वळून कस्तुरे चौकमार्गे स्वारगेटकडे जावे. लक्ष्मी रस्त्यावरुन टिळक चौकाकडे (अलका टॉकीज) जाणाऱ्या वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौक, जिजामाता चौक, फुटका बुरुज, महापालिकामार्गे झाशीच्या राणी चौकाकडे जावे. बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक गर्दी वाढल्यास टिळक रस्त्यावर पूरम चौकातून वळविण्यात येईल. वाहनचालक टिळक रस्त्याने खंडोजीबाबा चौकात जातील. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.