शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:50+5:302021-09-19T04:12:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड वाहनांसाठी रविवारी बंद ...

Shivaji Road, Laxmi Road, Bajirao Road will remain closed | शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड राहणार बंद

शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड राहणार बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड वाहनांसाठी रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून गणेश विसर्जन संपेपर्यंत हा वाहतुकीतील बदल असणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते रविवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार विसर्जन मिरवणुकींना मनाई आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन जागेवरील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदात करावे लागणार आहे. मध्यवर्ती भागात मानाचे व प्रमुख गणेशोत्सव मंडळे असल्याने नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ते प्रमुख व मानाच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत रस्ते बंद असतील.

शिवाजी रोड : शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणारा शिवाजी रोड स.गो.बर्वे चौकातून वाहतुकीसाठी बंद असेल. वाहनचालकांनी जंगली महाराज रोड, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रोड मार्गे स्वारगेट व इच्छितस्थळी जावे.

बाजीराव रोड : स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौक येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रोड, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रोडने गणेशखिंड रोड, शिवाजीनगर किंवा इच्छितस्थळी जावे.

लक्ष्मी रोड : संत कबीर चौकापासून टिळक चौकापर्यंतची लक्ष्मी रोडवरील वाहतूक संपूर्ण बंद राहणार आहे.

केळकर, कुमठेकर रोड या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक रविवारी बंद असेल. टिळक चौकातूनच या दोन्ही रस्त्यांवर जाणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.

अंतर्गत रस्तेही बंद : नागरिकांची व वाहनांची रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येणार आहे. याच पद्धतीने महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बेलबाग चौक, शनिवारवाडा या ठिकाणी जाणारे अंतर्गत रस्तेही बॅरिकेड्स टाकून बंद केले जाणार आहेत.

..........

गणेशोत्सव विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते रविवारी सकाळपासूनच बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनीही मध्यवर्ती भागात न येता पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Web Title: Shivaji Road, Laxmi Road, Bajirao Road will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.