शिवाजीनगर भोसले सहकारी बँक कर्जप्रकरण; रेखा बांदलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:04+5:302021-07-14T04:15:04+5:30
पुणे : गाळ्यांचे बनावट कुलमुखत्यार व पुरवणी दस्त तयार करून शिवाजीनगर भोसले सहकारी बँकेच्या वडगाव शेरी शाखेतून सव्वा कोटी ...
पुणे : गाळ्यांचे बनावट कुलमुखत्यार व पुरवणी दस्त तयार करून शिवाजीनगर भोसले सहकारी बँकेच्या वडगाव शेरी शाखेतून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचा माजी सभापती मंगलदास बांदलची पत्नी रेखा बांदल हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी (दि. १३) फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
आर्थिक लाभासाठी आरोपींनी संगनमताने हा गंभीर गुन्हा केला. आरोपींना जामीन झाल्यास गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीचा अर्ज फेटाळण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली होती. या प्रकरणी दत्तात्रय रावसाहेब मांढरे (वय ५३, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंगलदास व रेखा बांदल यांच्यासह सात जणांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २००४ ते मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
काय आहे प्रकरण?
मुख्य आरोपी मंगलदास बांदल याने फिर्यादीच्या नावे दोन गाळ्यांचे परस्पर बनावट खरेदीखत करून, त्यावर फिर्यादीच्या नावे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या खराडी शाखेतून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर २६ सप्टेंबर २००६ रोजी फिर्यादीच्या जागी अनोळखी व्यक्ती उभा करून बनावट कुलमुखत्यार दस्त व पुरवणी दस्त तयार केले. त्याआधारे मंगलदास व रेखा बांदल यांनी गहाणखत तयार करून या गाळ्यांवर भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर शाखेतून नोव्हेंबर-डिसेंबर २००७ मध्ये रेखा बांदल यांच्या नावे सव्वा कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. याबाबत फिर्यादींनी आरोपीला विचारणा केल्यावर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.