शिवाजीनगर बसस्थानकाला अखेर मुहूर्त; लवकरच सादर होणार नव्या स्थानकाचे डिझाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:35 PM2023-11-28T13:35:38+5:302023-11-28T13:36:03+5:30
व्यापारी संकुलाचा निर्णय लांबणीवर...
- राजू इनामदार
पुणे : तब्बल साडेतीन वर्ष प्रवाशांचा अंत पाहणाऱ्या शिवाजीनगर एसटी स्थानकाचे बांधकाम करण्याच्या निर्णयाला अखेर मुहूर्त लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या मागणीप्रमाणे हे स्थानक आता महामेट्रोच त्यांच्या खर्चाने बांधून देणार आहे. या नव्या स्थानकाचे डिझाईन प्रसिद्ध वास्तूविशारद शशी प्रभू करत असून, येत्या आठवड्यातच महामंडळ व मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचे सादरीकरण ते करणार आहेत.
नवीन स्थानक अत्याधुनिक तर असेलच; त्याचबराेबर येथून रेल्वे, मेट्रो तसेच खासगी प्रवासी व्यवस्था अशा सर्व ठिकाणी प्रवाशांना जाता येईल, अशी व्यवस्था त्यात असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सध्या सुरू असलेली गैरसाेय लवकरच दूर हाेणार आहे.
दरम्यान, मेट्रोच्या कामासाठी म्हणून पुण्यातील हे अतिशय महत्त्वाचे असे स्थानक पाडले हाेते. महामंडळाच्या ३ हजार ७०० चौरस मीटरपेक्षा अधिक जागेवर स्थानक उभे होते. ते पाडले गेले, त्याचवेळी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात नव्या बांधकामाविषयी करार झाला होता. त्यात नंतर राजकीय हस्तक्षेप झाले आणि स्थानकाच्या वरील जागेत व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव आला. ते महामेट्रोने बांधायचे की पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप), बीओटी (बिल्ट इट, ऑपरेट इट ॲन्ड ट्रान्स्फर इट) या तत्त्वावर बांधायचे यातच हा प्रश्न अडकून पडला. दरम्यानच्या काळात सरकार कोसळले, नवे सरकार आले, त्यातील मंत्रीपद वेळेवर निश्चित होईनात अशा सगळ्या गोष्टींमध्ये स्थानकाचा विषय रखडला होता.
जुने स्थानक महामेट्रोने पाडले त्याला तीन वर्षे होऊन गेली. पर्यायी जागा म्हणून महामेट्रोने सरकारी दूध डेअरीची वाकडेवाडी येथील जागा भाडेतत्त्वावर घेऊन ती महामंडळाला दिली. तिथे तात्पुरते स्थानक बांधून दिले. पाडलेल्या जागेवर महामेट्रोने त्यांच्या भुयारी स्थानकाचे काम सुरू केले. ते अडीच वर्षात पूर्णही केले. मात्र वरच्या जुन्या जागेवर नवे एसटी बसस्थानक बांधून देणे थांबले.
दरम्यानच्या काळात प्रवाशांना वाकडेवाडीतील एसटी स्थानकाचा बराच त्रास सहन करावा लागतो आहे. शहरापासून ते दूर अंतरावर आहे. तिथून शहरात येणे किंवा जाणे दोन्ही गोष्टी आर्थिक भुर्दंड देणाऱ्या आहेत. आता महामेट्रोने सदर स्थानक बांधून देण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचा हा त्रास वाचणार आहे.
व्यापारी संकुलाचा निर्णय लांबणीवर :
स्थानकाच्या वर बांधायच्या व्यापारी संकुलाचा निर्णय तूर्त लांबणीवर ढकलण्यात आला आहे, मात्र वर बांधकाम करायचे आहे हे लक्षात घेऊनच स्थानकाची रचना करावी अशा सूचना वास्तूविशारदाला देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद शशी प्रभू यांना पुण्यातील या स्थानकाचे डिझाईन करण्याचे काम देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात ते याचे सादरीकरण करणार आहेत.
कनेक्टिव्हिटी वाढवणार :
याबाबत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुन्या एसटी स्थानकाहून हे नवे स्थानक पूर्ण वेगळे असेल. तिथे प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक व्यवस्था असतीलच, त्याशिवाय त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून वेगळी अंतर्गत व्यवस्था असणार आहे. या स्थानकापासून रेल्वे स्थानक जवळच असणार आहे. मेट्रोचे भुयारी स्थानक एसटी बसस्थानकाच्या बरोबर खाली असेल. त्याशिवाय रिक्षा व शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीची पीएमपीची स्थानकेही एसटी स्थानकापासून जवळच असणार आहेत. स्थानकातील प्रवाशांना या सर्व ठिकाणी स्थानकामधूनच जाता येईल.
बैठकीत काढला ताेडगा :
मागील ३ वर्षे पुण्यातून एसटीने नियमित प्रवास करणाऱ्यांना वाकडेवाडी स्थानकाचा बराच त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातही पुन्हा जागेचे मालक असणाऱ्या सरकारी डेअरीने महामेट्रोला ही जागा परत मागितली आहे. त्याचे भाडे जमा करणे महामेट्रोला फार अवघड नसले तरी ते किती काळ भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच महामंडळ व महामेट्रो यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन स्थानकाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवाजीनगर एसटी स्थानकाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे आणि ते मुदतीत पूर्णही व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. जुने एसटी स्थानक ही पुण्याची ओळख होती. नव्या एसटी स्थानकातही ती ओळख कायम राहावी अशा पद्धतीचे नवे बांधकाम असावे, अशी आमची अपेक्षा आहे. शशी प्रभू यांच्याकडे हे काम दिले आहे.
- विद्या भिलारे, मुख्य स्थापत्य अभियंता, एसटी महामंडळ