शिवाजीनगर बस स्थानकाचे होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:27 PM2018-08-11T16:27:20+5:302018-08-11T17:11:14+5:30
मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे.
पुणे : मेट्रो तसेच बस पोर्टच्या कामासाठी शिवाजीनगर येथील बसस्थानक लवकरच अन्यत्र स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी सध्या तीन जागांची पाहणी करण्यात आली असून त्याला अद्याप एसटी महामंडळाने हिरवा कंदील दिलेला नाही. आॅक्टोबर महिन्यापुर्वी हे स्थलांतर करावे लागणार आहे.
शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाची १५ हजार ७०० चौरस मीटर जागा आहे. सध्या या जागेवर बसस्थानक, वर्कशॉप व एसटीची कार्यालये आहेत. या जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तसेच महामेट्रोकडून या जागेत भुयारी स्थानक केले जाणार आहे. त्याबाबत महामेट्रोकडून एसटीला याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. भुयारी स्थानक व बोगद्याचे काम आॅक्टोबर महिन्यापासून करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यापूर्वी येथील बसस्थानक, वर्कशॉप इतरत्र हलवावे लागणार आहे. महामेट्रोला एसटीकडून ३ हजार १८५ चौरस मीटर जागा दिली जाणार आहे. त्याचा करार लवकरच होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यापैकी एक जागा अंतिम झाल्यानंतर बसस्थानकाचे स्थलांतर सुरू केले जाईल. मात्र, या जागेवरून केवळ बस सोडल्या जाणार आहे. तिथे वर्कशॉपची उभारणी केली जाणार आहे. स्वारगेट, पिंपरी या आगारांमध्ये वर्कशॉप व इतर कामे होणार आहे. त्यामुळे एसटीला काहीसा भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.
------------