शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो भूमिपूजन एप्रिलअखेर
By admin | Published: December 25, 2016 04:51 AM2016-12-25T04:51:58+5:302016-12-25T04:51:58+5:30
मेट्रोचे वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे भूमिपूजन आज झाल्यानंतर आता तिसऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या पीएमआरडीएमार्फत केल्या
पुणे : मेट्रोचे वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे भूमिपूजन आज झाल्यानंतर आता तिसऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या पीएमआरडीएमार्फत केल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गाला येत्या मार्च २०१७ पर्यंत सर्व प्रकारच्या मान्यता मिळतील, त्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये त्या मार्गाचेही भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मेट्रोच्या भूमिपूजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित न केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून पालिकेच्या वतीने स्वतंत्र भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर महापालिकेचा स्वतंत्र भूमिपूजनाचा कार्यक्रम महापौरांनी रद्द केला. मात्र काँग्रेसने स्वतंत्र मेट्रोचे स्वतंत्र भूमिपूजन करण्याची भूमिका कायम ठेवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी स्वतंत्र भूमिपूजन पार पाडले. भूमिपूजनावरून झालेल्या या वादाचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.
फडणवीस म्हणाले, ‘‘मी लहान असताना दिल्लीला फिरायला गेलो होतो, त्या वेळी लाल किल्ल्यासमोर उभे राहून मी पंतप्रधानांप्रमाणे मोठ्या त्वेषाने भाषण केले. मात्र लाल किल्ल्यावरून भाषण केले, म्हणून मी पंतप्रधान होत नाही. त्याचप्रमाणे शुक्रवारी काँग्रेसने केलेल्या भूमिपूजनाचे वर्णन करावे लागेल, त्याला कोणतीही कायदेशीरता नव्हती, तरीही त्यांनी मेट्रोचे भूमिपूजन केले.’’
मेट्रोच्या प्रस्तावावर २५६ आक्षेप काँग्रेसच्या सरकारने नोंदविलेले होते, ते आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या टेबलावर परत आले होते, असे सांगून काँग्रेसच्या सरकारमुळे मेट्रोला विलंब झाल्याकडे फडणवीस यांनी निर्देश केला. पुणे शहराचे जगभरात चांगले नाव आहे, परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक करण्यासाठी पुण्यालाच नेहमी प्राधान्य दिले जाते, मात्र येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकच कमतरता होती. आमच्या सरकारने ती आता दूर केली असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी होणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी देऊन पिंपरी-चिंचवडवर झालेला अन्याय दूर केल्याने फडणवीस यांनी नायडू यांचे विशेष आभार मानले.