Pune Metro | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामही सुसाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:52 AM2022-07-14T11:52:48+5:302022-07-14T11:55:56+5:30
पीपीपी तत्त्वावर सुरू आहे काम...
पुणे: पुण्यातील सर्वाधिक अंतराचा तिसरा मेट्रो मार्ग अशी ओळख मिळालेल्या शिवाजीनगर-हिंजवडीमेट्रो मार्गाचे कामही सुसाट सुरू झाले आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हे काम सुरू असून, या मार्गावरील २२ खांब बांधून तयार झाले आहेत. या कामातील प्रगतीमुळे हिंजवडीतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा प्रवास लवकरच सुकर हाेणार आहे.
या कामासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून हे काम होत आहे.
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले की, बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ या मार्गाचे १० व्या क्रमांकांचे नियोजित मेट्रो स्थानक आहे. मेट्रो धावणाऱ्या खांबासाठी जमिनीत पाया घ्यावा लागतो. त्यासाठी पाईलिंग म्हणजे जमिनीत खोदकाम करावे लागते. असे १ हजारावे पाईलिंग १२ जुलैला पूर्ण झाले.
‘पीएमआरडीए’कडे हाेणार हस्तांतर
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी हब थेट पुणे शहराबरोबर जोडला जाणार आहे. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) या तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीद्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे. त्यानंतर तो ‘पीएमआरडीए’कडे हस्तांतरित केला जाईल.
आतापर्यंत एकूण २२ खांब तयार झाले आहेत. या खांबांवर बसवाव्या लागणाऱ्या सेगमेंटचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी काम सुरू आहे. वाहतुकीला फार त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. वाहतूक शाखा तसेच नागरिकांकडून मेट्रोच्या कामाला संपूर्ण सहकार्य मिळत आहे.
- आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीआयसीटीएमआरएल