शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाला मिळाली मंजुरी
By admin | Published: December 29, 2016 03:28 AM2016-12-29T03:28:33+5:302016-12-29T03:28:33+5:30
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाझ या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी
पुणे : स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाझ या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी ७ हजार ९४७ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून त्याला बुधवारी मान्यता मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिल्ली मेट्रो कॉपोर्रेशनकडून या मार्गाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘तंत्रज्ञान क्षेत्राचा पुण्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये २ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. दुचाकी आणि चारचाकी अशा सुमारे दोन लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. सार्वजनिक व खासगी अशा एकूण ८८५ बस याच मार्गावरून जात-येत असतात. पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल १५०० कोटी रुपये इतकी आहे. या मार्गावर किती आणि कुठे स्टेशन असतील, तसेच या मार्गासाठी किती खर्च येणार, या सर्व गोष्टींचा समावेश आराखड्यात आहे.’’
शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रकल्प ३१ किमी लांबीचा असून यावर २३ ते २५ स्थानके असतील. याकरिता ३१ हेक्टर जमिनी संपादित करणार आहे. पीएमआरडीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव दिल्लीच्या केंद्रीय नगरविकास खात्याकडे पाठविला जाईल. केंद्राच्या मान्यतेनंतर तो राज्य शासनाकडे येईल. या प्रकल्पासाठी येणारा खर्च केंद्र शासनाकडून २० टक्के, राज्य शासन २० टक्के, पीएमआरडीए २० टक्के आणि इतर पीपीपी मॉडेल/सीस चॅलेंज सिस्टीमद्वारे ५० टक्के करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवतीच्या पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. पीएमआरडीएच्या बरोबरीने महाराष्ट्र विकास रस्ते महामंडळाचा रिंगरोड असे दोन प्रस्ताव होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिंगरोडचा आराखडा मंजूर करण्यात आला.
- ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारला जाईल, असेही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निधीसाठी काही अडचण येणार नाही, असेही बापट यांनी सांगितले.
- या प्रकल्पासाठी केंद्र सरकार २० टक्के, राज्य सरकार १४ टक्के, तर समभागातून २१ टक्के निधी उभारला जाणार आहे. तसेच उर्वरित निधी कर्जाद्वारे उभा करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोचा हा मार्ग २३.३३ किमीचा असेल. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गालाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला निश्चितपणे गती मिळणार आहे. पुणेकरांच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. -गिरीश बापट, पालकमंत्री