शिवाजीनगरला आपलाच मतदार, भाजपला खात्री; लीड आपल्याला नक्की मिळेल, 'मविआ' ची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:34 PM2024-05-19T13:34:22+5:302024-05-19T13:34:48+5:30
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपचा असून तो जिंकण्यासाठी काँग्रेसला बरेच काम करावे लागणार
राजू इनामदार
पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांचेही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष होते. त्याची कारणे अर्थातच विधानसभेच्या मागील म्हणजे सन २०१९ च्या निवडणुकीत आहे. फारच थोड्या मतांच्या फरकाने (५१२४) हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून निसटला. त्यामुळे इथून आपल्याला नक्की लीड मिळेल, अशी काँग्रेसची म्हणजे महाविकास आघाडीची अपेक्षा आहे. दुसरीकडे हा तर आपलाच मतदारसंघ, अशा खात्रीने महायुतीलाही इथून कधीही धोका होणार नाही याची खात्री आहे. तरीही अन्य विधानसभा मतदारसंघात लोकसभेचा जसा प्रचार केला गेला तसा इथे झाला नाही.
भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे सन २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांचे वडील अनिल शिरोळ त्याआधी पुणे लोकसभेचे खासदार होते. त्याही आधी शिरोळे घराण्याकडेच, पण काँग्रेसकडे हा मतदारसंघ होता. सन २००८ मध्ये त्याची पुनर्रचना झाला. कोथरूडचा बराच मोठा भाग त्यातून निघाला. खडकी कॅन्टोन्मेट शिवाजीनगरला जोडण्यात आले. त्याशिवाय बोपोडीदेखील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आहे.
पोलिस वसाहतींपासून ते गरीब, कष्टकऱ्यांच्या वसाहतीपर्यंत मिश्र वस्तीचा हा मतदारसंघ आहे. काँग्रेसकडे असणारा हा मतदारसंघ आपल्याकडे वळवून घेण्यात भाजपला यश आले ते संघटनेच्या बळावर. पुनर्रचनेपूर्वी अण्णा जोशी, त्यानंतर विजय काळे यांनी मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. नाही म्हणायला मध्यंतरी दोन वेळा कै. विनायक निम्हण यांनी त्यावर एकदा शिवसेनेचा, तर दुसऱ्या वेळी काँग्रेसचा झेंडा रोवला, पण ते तेवढ्यापुरतेच.
भाजपमध्ये अनेक इच्छुक
सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी सन २०१९ मध्ये लोकसभेला अनिल शिरोळे यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी सिद्धार्थ यांना शिवाजीनगरमध्ये आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. नगरसेवक म्हणून ते कार्यरत होतेच. पण, तरीही त्यांची बरीच दमछाक झाली. काँग्रेसकडून दत्ता बहिरट यांनी त्यांना चांगली लढत दिली. यंदाही पुन्हा हाच सामना होण्याची दाट शक्यता आहे. भाजपत उमेदवारीवरून वाद होतील असे दिसते. याचे कारण मागील वेळची कमी मतांची आघाडी हेच आहे. त्यात इच्छुकांची संख्या फार मोठी. माजी आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण यांच्यापासून अनेकजण तिथे इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी म्हणूनही सिद्धार्थ यांना बरीच कसरत करावी लागेल, पण ते ती मिळवतील असे सध्याचे चित्र आहे. त्यांनी स्थानिक स्तरावर, तसेच पक्षात वरिष्ठ स्तरावरही स्वत:ची चांगली प्रतिमा ठेवली आहे. त्याचा त्यांना उपयोग होईल.
काँग्रेसला करावे लागेल काम
लोकसभेत नक्की काय होते ते ४ जूनला समजेलच, पण महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील असे दिसते. त्यांचे मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) याला फार हरकत घेतील असे दिसत नाही. पण, काँग्रेसला या मतदारसंघात जिंकायचे असेल तर बरेच काम करावे लागले. मागील निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. संघटना स्तरावर काँग्रेस पक्ष जवळपास बाद झाल्यासारखाच आहे. नाराजी, गटबाजी यांनी संपूर्ण पक्ष पोखरला गेला आहे. मतदारांना बरोबर घ्यायचे असेल तर आधी पक्ष नीट असावा लागतो. तसे निदान आता तरी दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसची हीच स्थिती ओळखून महाविकास आघाडीतील अन्य पक्ष विशेषत: शिवसेना ही जागा मिळावी यासाठी आग्रही असेल. त्यांच्याकडे आता नाव घ्यावे असे कोणी उमेदवार नसले तरी ही परिस्थिती ऐनवेळी बदलू शकते. काँग्रेसला ही बांधबंदिस्ती करावीच लागेल.
मनसेही करू शकते दावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी २००९ मध्ये येथून निवडणूक लढवून त्यात चांगली मते (२६,१४३) मिळविली होती. ते तिसऱ्या क्रमाकांवर होते. आता त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच विधानसभेच्या तयारीला लागा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे रणजित शिरोळे मागणी करणार हे नक्की. त्यांनाही शिरोळे घराण्याचा वारसा आहेच. सध्या मनसे महायुतीबरोबर आहे, पण ते तसेच राहतील असे सांगता येत नाही. त्यामुळे शिरोळे मनसेचे उमेदवार असू शकतात. तसे झाले तर या मतदारसंघातील विधानसभा निवडणूक रंगतदार ठरेल.
लोकसभेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार : २,७८,५३०
प्रत्यक्ष झालेले मतदान : १,४४,१३३
टक्केवारी : ५०.६७%