आराखडाच नसल्याने रखडले शिवाजीनगर एसटी स्थानक; अधिकाऱ्यांची चुप्पी
By राजू इनामदार | Published: March 15, 2023 04:31 PM2023-03-15T16:31:12+5:302023-03-15T16:31:56+5:30
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खराब असून कर्मचाऱ्यांचे वेतन करायला पैसे नाहीत ते बांधकामासाठी कुठून आणणार असा प्रश्न
पुणे : महामेट्रोच्या कामासाठी पाडलेल्या शिवाजीनगर एसटी स्थानकाचा नव्याने आराखडाच तयार नाही. त्यामुळेच नवे बांधकाम रखडले आहे. महामेट्रो व एसटी महामंडळ या दोन्ही विभागांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी याविषयावर चुप्पी ठेवली आहे. सरकारमध्ये परिवहन मंत्रीच नाही व दोन विभागात समन्वय नाही याचा त्रास मात्र प्रवाशांना तब्बल दोन वर्षांहूनही अधिक काळ सहन करावा लागतो आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने प्रवाशांना अतीशय सोयीचे असलेले शिवाजीनगर एसटी स्थानक महामेट्रोने त्यांच्या भूयारी स्थानकासाठी पाडून टाकले. ते पाडताना एसटी महामंडळ व महामेट्रो यांच्यात करार झाला. त्या करारानुसार महामंडळाच्या ४ एकर जागेपैकी १ एकर जागा महामेट्रोने त्यांच्या कार्यालय व अन्य इमारतींसाठी म्हणून घेतली. या जागेचे व्यावसायिक मुल्य जेवढे असेल त्या मुल्यातून महामेट्रोने महामंडळाला स्थानक व त्याखाली बेसमेंट असे बांधकाम करून द्यायचे आहे. आता महामंडळ बेसमेंट, स्थानक व त्यावर व्यापारी संकूल असे बांधकाम महामेट्रोकडे करून मागत आहे. महामेट्रोचा त्याला नकार आहे.
महामेट्रोचे भूयारी स्थानक आता बांधून तयार आहे. करारानुसार बेसमेंट व स्थानक बांधून द्यायची महामेट्रोची तयारी आहे. मात्र काय बांधायचे याचा आराखडाच तयार नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. वरचे व्यापारी संकूल पीपीपी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) बांधून घ्यायचे असा महामंडळाचा निर्णय झाला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार होते त्यात एसटी महामंडळच हे संकुल बांधेल असा ठरवण्यात आले. त्यामुळे या विषयावर पुढे काहीच झाले नाही. आता इमारतीचा आराखडाच नाही व भूयारी स्थानक तर बांधून तयार झाले अशी स्थिती आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खराब आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करायला पैसे नाहीत ते बांधकामासाठी कुठून आणणार असा प्रश्न आहे. महामेट्रोचे म्हणणे १ एकर जागेच्या मुल्यात जेवढे बांधकाम होते तेवढे करून देण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र त्यासाठी आधी नव्या इमारतीचा आराखडा दाखवा. महामंडळाचे स्थानिक किंवा वरिष्ठ अधिकारीही स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत. सरकारी स्तरावर राजकीय सारीपाटाचा खेळ सुरू असल्याने याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही अशा तिढ्यात प्रवाशांसाठी अतीशय महत्वाचे असलेले हे मध्यवर्ती एस.टी. स्थानक सापडले आहे.
''विधानसभेत प्रश्न विचारल्यानंतर आता या संदर्भात किमान काही हालचाल तरी सुरू झाली आहे. वाकडेवाडीला जाण्यासाठी किंवा तिथून शहरात येण्यासाठी प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागतो. एसटी महामंडळ व महामेट्रोचे अधिकारी यांच्यात लवकरच संयूक्त बैठक होऊन यावर काहीतरी तोडगा निघेल असा विश्वास आहे. - सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ''