शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:17+5:302021-09-08T04:16:17+5:30
पुणे : शिक्रापूर गावाच्या हद्दीतील जमिनीवर एकाने पावणेदोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले असताना व ते भरलेले नसताना देखील या ...
पुणे : शिक्रापूर गावाच्या हद्दीतील जमिनीवर एकाने पावणेदोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले असताना व ते भरलेले नसताना देखील या जमिनीवरचा बोजा कमी करण्यासाठी ना हरकत दाखला देत, जामीनदारांची पडताळणी न करता पावणेदोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कोथरूड शाखेच्या व्यवस्थापकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
नितीन मारूतराव बाठे (वय ५१, रा. पाषाण) असे जामीन फेटाळलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. त्याच्यासह कृष्णाजी ज्ञानोबा विरोळे (रा. तळेगाव ढमढेरे) याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंदार महेंद्र पवार (वय ४०, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१२ मध्ये घडला.
कृष्णाजी विरोळे याने फिर्यादींच्या खोट्या सह्या आणि कागदपत्रे वापरून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कोथरूड शाखेतून १३ जानेवारी २०१२ रोजी पावणेदोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्याची परतफेड न केल्याने बँकेकडून फिर्यादींना नोटीस पाठविण्यात आली. फिर्यादींनी विरोळेकडे विचारणा केली असता, ‘मी कर्ज प्रकरण भरून टाकणार आहे, तू काळजी करू नको’ असे विरोळेने त्यांना सांगितले. त्यावर फिर्यादींनी विश्वास ठेवला. मात्र, पुन्हा बँकेची नोटीस आल्यावर फिर्यादींनी विरोळेला विचारणा केली. त्यावेळी विरोळेने सर्व कर्ज भरल्याचा बँकेचा बनावट दाखला दाखवून फिर्यादींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात अटक आरोपी नितीन बाठे याने जामिनावर मुक्तता करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी विरोध केला.