शिवशाहिरांचे पहिले भाषण
By Admin | Published: February 7, 2015 11:40 PM2015-02-07T23:40:01+5:302015-02-07T23:40:01+5:30
गेली ६० वर्षे शिवचरित्र कथनासाठी अव्याहतपणे शब्द अन् शब्द खर्च करणारे बाबासाहेब पुरंदरे म्हणजे जणू चालताबोलता इतिहास. त्यांच्या वाणीने इतिहास 'बोलका' केला.
गेली ६० वर्षे शिवचरित्र कथनासाठी अव्याहतपणे शब्द अन् शब्द खर्च करणारे बाबासाहेब पुरंदरे म्हणजे जणू चालताबोलता इतिहास. त्यांच्या वाणीने इतिहास 'बोलका' केला. या प्रवासातील पहिल्या भाषणाची कथाही रंजक आहे.
णी नव्हे खडू जोधार की
विजेचा लोळ चर्रर्र ।
करी शिवसृष्टीचा उच्चार
जणू घन घडघडती।।
असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वक्तृत्वाचे वर्णन ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले आहे. गेली ६० वर्षे शिवचरित्रकथनासाठी बाबासाहेबांची भ्रमंती सुरू आहे. शिवचरित्रकथन करण्यासाठी पांडित्याची वस्त्रे परिधान करण्यापेक्षा देश जागविणाऱ्या शाहिराचीच वसनं त्यांनी अधिक पसंत केली आणि परमपवित्र अशा शिवचरित्राची शाहिरी ते करीत राहिले. त्यांनी आजवर दिलेल्या व्याख्यानांची संख्या बारा हजारांहून अधिक आहे.
बाबासाहेब एक गमतीशीर आठवण नेहमी सांगतात. ते म्हणतात, ‘मला तीन गोष्टींचा अतिशय कंटाळा आहे. एक दाढी करण्याचा, दुसरा झोपेतून उठल्यानंतर अंथरूण गोळा करण्याचा आणि तिसरा व्याख्याने देण्याचा. पहिल्या दोन प्रकारांतून मी माझी सुटका करून घेतली; पण तिसरी गोष्ट वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या मानगुटीवर जी बसली, तिने आजपर्यंत माझी पाठ सोडलेली नाही, ती गोष्ट म्हणजे व्याख्यान देणे.’’
गोष्टी सांगण्याची ही कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडूनच. त्यांच्या वडिलांचे बोलणे तिखट असले तरी ते मुलांशी खूप प्रेमळपणे वागत. त्यांचे वाचन अफाट होते. इतिहासातल्या, पुराणातल्या, रामायण-महाभारतातल्या कितीतरी गोष्टी त्यांचे वडील त्यांना सांगत असत. नाटके पाहण्यासाठी ते मुलांना बरोबर घेऊन जात. बाबासाहेबांच्या वडिलांचे पाठांतर उत्तम होते आणि कथनशैलीही सुरेख होती. रोज एकतरी गोष्ट ते बाबासाहेबांना सांगत. बाबासाहेबांच्या आईला ते थोरले श्रीमंत आणि बाबासाहेबांना धाकटे श्रीमंत म्हणत. बाबासाहेबांच्या कथनशैलीवर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव पडला. त्यामुळे आजही बाबासाहेब गमतीने म्हणतात, ‘‘माझे आईवर शंभर टक्के प्रेम आहे आणि वडिलांवर एकशेएक टक्के प्रेम आहे.’’ मोलाचे सांस्कृतिक धन बाबासाहेबांना लहान वयातच मिळाले. त्यातून लेखनाची, काव्यरचनेची आणि अभिनयकलांची वाढ आणि जोपासना झाली.
बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या आठव्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ, तिथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा व्हायचा तो थाटामाटात. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंहजयंतीच्या दिवशी एका कीर्तनकाराचे नृसिंहअवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनकाराला त्या वेळी दोन रुपये बिदागी मिळायची. त्या दोन रुपयांतूनच त्याने पेटी आणि तबला वाजविणाऱ्या कलाकारांची बिदागी द्यायची; असा सगळा मामला असायचा. त्या वर्षी गंमतच घडली. नृसिंहजन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ता नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामांच्या जिवाची घालमेल सुरू होती. कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इभ्रतीला साजेसा उत्सव त्यांनी आजवर केला होता. हाफचड्डी आणि शर्ट घातलेले पोरसवदा बाबासाहेब हे सारं पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुला नृसिंहजन्माची गोष्ट माहीत आहे ना? ती तू सांग.’’
बाबासाहेब गडबडलेच; कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागांत कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही, त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची? असा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता. ते काकुळतीला येऊन मामांना म्हणाले, ‘‘मला नाही त्या कीर्तनकारासारखी गोष्ट सांगता येणार!’’
धीर देत मामा म्हणाले, ‘‘तुला जशी गोष्ट सांगता येते तशी ती तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा आग्रह नाही.’’ इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला. प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंहजन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रकटलेल्या नृसिंहाने प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वत:च्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला, हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला, की लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. हा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाचा बाहेर काढलेला कोथळा यात बाबासाहेबांना खूप साम्य जाणवले. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यानरूपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
पुढे बाबासाहेबांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. ती तारीख होती २५ डिसेंबर १९५४. बाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही नाही म्हणालात तर लोक काय म्हणतील? बहिणीचे भावावर काहीच वजन नाही.’’ त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणे अवघड झाले.
त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला शंभर एक लोक उपस्थित होते. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडतं, याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला. देशाच्या सीमा ओलांडून बाबासाहेबांची परदेशातही व्याख्याने झाली. अमेरिकेत एकेका दिवशी पाच व्याख्याने झाली. आज वयाची नव्वदी पार केली तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू आहे.
(लेखक साहित्यिक आहेत़)