रायगडावर व्हावे शिवरायांचे स्मारक; प्रभाकर कोल्हटकर यांच्याकडून राज्य शासनाला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:18 AM2018-10-29T02:18:59+5:302018-10-29T06:40:51+5:30
मुंबईमध्ये अरबी समुद्रात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा चुकली आहे काय, याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेमुळे चर्चा सुरू झाली आहे
- लक्ष्मण मोरे
पुणे : मुंबईमध्ये अरबी समुद्रात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा चुकली आहे काय, याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेमुळे चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवरायांची राजधानी व स्वराज्यातील अनेक सुखदु:खांचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे, अशी कल्पना सरदार सरोवरावरील सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाची संकल्पना मांडणाऱ्या प्रभाकर कोल्हटकरांनी मांडली असून, त्याचे देखणे संकल्पनाचित्रही त्यांनी रेखाटले आहे. त्याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठविला आहे.
अरबी समुद्रातील स्मारकावरून चर्चांना उधाण आले आहे. काही संघटनांनी हे स्मारक जमिनीवर उभारावे, तर काही संघटनांनी हे स्मारक समुद्रातच उभारावे, अशी भूमिका घेतली आहे. ही चर्चा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राजगडावर एक स्मारक व्हावे व त्या स्मारकावरून संपूर्ण सह्याद्रीही पाहता यावा,अशी संकल्पना मांडली आहे. स्वत: आर्किटेक्ट असल्याने त्यांनी त्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.
काय आहे नेमकी कल्पना?
रायगडावर चार मजली ऐतिहासिक धाटणीची इमारत बांधली जावी. त्याला भवानीमंडप असे नाव असावे. या इमारतीमध्ये प्रबोधन केंद्र, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे कायमस्वरूपी संग्रहालय, शिवरायांनी केलेल्या लढाया, डावपेच, गनिमीकावा याची सविस्तर माहिती लिखित वा चित्रांच्या स्वरूपात असावी. दृकश्राव्य माध्यमातून शिवरायांचा जीवनपट या ठिकाणी उलगडला जावा.
भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या शूरवीरांनी देशरक्षणार्थ बलिदान दिले, शौर्य गाजविले त्यांची माहिती कायमस्वरूपी प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जावी. ‘स्पेस सायन्स’, रॉकेट्री, आधुनिक क्षेपणास्त्रांची माहिती आणि अभ्यासकेंद्र निर्माण करावे.
या इमारतीच्या कळसावर तब्बल ९० फूट अशी तलवारीची उभी प्रतिकृती उभारावी, अशी कल्पनाही त्यांनी मांडली आहे. सरळ आकाशाकडे झेपावणारी ही तलवार लांबच्या अंतरावरूनही दिसेल. या तलवारीच्या दोन्ही बाजूला काचेच्या ‘कॅप्सूल’ लिफ्ट असतील. एका बाजूने पर्यटक, अभ्यासक तलवारीच्या वरच्या टोकाला जातील. तेथे थांबून संपूर्ण सह्याद्री आणि त्याचा विस्तार अनुभवतील. दुसºया बाजूने पुन्हा खाली येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा येणाºया पिढ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि मुळातच शिवराय व रायगड समजून घेण्यासाठी रायगडावरच स्मारक होणे आवश्यक आहे. मी ही संकल्पना मांडली असून, माझ्या परिचितांमार्फत शासनापर्यंत ही संकल्पना पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडाची आजची अवस्था पाहता तेथे अशा स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना आकर्षित करू शकेल, असे स्मारक आवश्यक आहे. माझ्या वडिलांना आणि मलाही शिवरायांबद्दल विशेष आदर आणि प्रेम असल्यामुळे मी संकल्पना मांडली आहे.
- प्रभाकर कोल्हटकर
कोण आहेत कोल्हटकर?
प्रभाकर कोल्हटर यांचे वय ८८ वर्षे आहे. ते आर्किटेक्ट असून बरीच वर्षे नगररचनाकार म्हणून शासकीय सेवा केली आहे. त्यांचे वडील ब्रिटिश काळापासूनचे नावाजलेले शिल्पकार होते. गुजरातमधील सरदार सरोवरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वांत उंच स्मारक तयार करण्यात आले आहे. त्याची संक ल्पना, डिझाईन कोल्हटकर यांनीच तयार केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांनी सहा वर्षांपूर्वी ही कल्पना मांडली. ती अस्तित्वात आली असून, येत्या ३१ आॅक्टोबर रोजी त्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे.