‘शतकवीर’ शिवशाहिरांच्या अभीष्टचिंतनासाठी ‘शिवसृष्टी’ चैतन्यमयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:11+5:302021-08-14T04:15:11+5:30

पुणे : रांगोळीच्या पायघड्या...फुलांची सजावट...तुतारी वादन अन‌् इतिहासकालीन वेशभूषेतील मावळे...अशा भारावलेल्या वातावरणात ‘शिवकाल’ जिवंत झाल्याची अनुभूती शिवप्रेमींना मिळाली. निमित्त ...

‘Shivasrishti’ Chaitanyamayi for the aspirations of ‘Shatakveer’ Shivshahir | ‘शतकवीर’ शिवशाहिरांच्या अभीष्टचिंतनासाठी ‘शिवसृष्टी’ चैतन्यमयी

‘शतकवीर’ शिवशाहिरांच्या अभीष्टचिंतनासाठी ‘शिवसृष्टी’ चैतन्यमयी

Next

पुणे : रांगोळीच्या पायघड्या...फुलांची सजावट...तुतारी वादन अन‌् इतिहासकालीन वेशभूषेतील मावळे...अशा भारावलेल्या वातावरणात ‘शिवकाल’ जिवंत झाल्याची अनुभूती शिवप्रेमींना मिळाली. निमित्त होते सदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श सेनानीच्या भूमिकेत वावरणा-या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी अवघी ’शिवसृष्टी’ चैतन्यमयी झाली होती.

आंबेगाव बुद्रृक येथील शिवसृष्टी येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तिथीनुसार (दि.१३) शंभरीत पदार्पण केले. त्यानिमित्त १०० दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. ‘शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्त्रबुद्धधे यांच्या हस्ते पगडी परिधान करून बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने शिवशाहिरांना मानाचा मुजरा केला. यावेळी ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ चे विश्वस्त जगदीश कदम उपस्थित होते.

छात्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान पुरूषाचे स्मारक हे भव्यदिव्यच व्हायला हवे. माझ्या हयातीत ‘शिवसृष्टी’ साकार होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. देशातील इतर राज्यांमधील युगपुरूषांची देखील अशाच पद्धतीने यथोचित स्मारक उभी राहावीत अशी अपेक्षा बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवण्याचे जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितले आहे ते आपण पूर्ण करूयात. राजनीती आणि समाजकारण करा पण शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तो घेऊन पुढे जा ही शिकवण बाबासाहेबांनी दिली. मी" शिवसृष्टी"ला 1 लाख रुपये देत आहे.

डॉ विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, स्वराज्य आणि सुराज्य ही शिवाजी महाराजांची संकल्पना बाबसाहेबांनी जनमानसात रुजवली. जीवन कसे जगावे आणि का जगावे? हे त्यांनी शिकविले. बाबासाहेब हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रबोधन पुरुष म्हणून ओळखले जातील.

डॉ. मोहन भागवत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे बाबासाहेबांचे दैवत. एका प्रेरणास्रोत जीवनाची शंभरी सुरू होत आहे. समर्पण, निष्ठा आणि ध्यासातून त्यांनी समाज मन घडविले आहे.

सचिन तेंडुलकर म्हणाला, बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांवर 80 वर्षे अभ्यास करून शिवचरित्र जगभरात पोहोचविले याचे कौतुक आहे. मात्र, एक खंत कायम राहील की ’जाणता राजा’ बघण्याचा योग कामाच्या व्यापात जुळून आला नाही. बाबासाहेबांसमोर मी नतमस्तक होतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबासाहेबांना वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत शिवचरित्र पाठ झाले होते. गडकिल्ल्यांच्या भेटी, माहिती संकलित करणे यातून त्यांनी संशोधन वृत्ती जोपासली. ते शिवरायांचे आदर्श सेनानी ठरले आहेत.

जगदीश कदम यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

-----------------------------------

Web Title: ‘Shivasrishti’ Chaitanyamayi for the aspirations of ‘Shatakveer’ Shivshahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.