खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 07:42 PM2021-06-25T19:42:04+5:302021-06-25T20:47:05+5:30
याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून शिवधर्म संघटनेच्या सात कार्यकर्त्याना अटक केली आहे.
इंदापूर : भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील गुंड म्हणणाऱ्या इंदापूर मधील अशोक जिंदाल नावाच्या व्यावसायिकाला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळं फासत तसेच त्यांची धिंड काढत पोलिस ठाण्यात आणलं होतं. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी आता कडक कारवाई करत सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
याप्रकरणी उद्योजक अशोक जिंदाल यांना इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांवर तोंडाला मास्क न लावणे, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण, महाराष्ट्र पोलीस कायदा उल्लंघन,आपत्ती व्यवस्थापन कायदा,भारतीय साथरोग कायदा, व जिल्हाधीकारी यांचे आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या ७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. यात दीपक उर्फ सिताराम काटे (वय २८ रा.इंदापूर), अमोल अंकुश पवार ( वय २५ रा. अकलूज), कुणाल शिवाजी चव्हाण (वय ३३, रा. अकलूज जि. सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय २४ रा.अकलूज), किरण रवींद्र साळुंखे (वय २७ रा. भवानीनगर ता. इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय २५ रा. बारामती), सुनील विठ्ठल वायकर (वय ३३, रा. अकलूज) अशी नावे आहेेेत. शुक्रवारी ( दि. २५) आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता आरोपींची १५ हजार रूपये जात मुचलक्याच्या जामिनावर सुटका केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
इंदापूर येथे व्यावसायिक अशोक जिंदाल यांची गाडी अडवत त्यांच्या तोंडाला काळं फासत त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढण्याची घटना घडली होती. तसेच उदयनराजे यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या जिंदाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकारानंतर शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण पसरले होते.
काय आहे नेमकं प्रकरण
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एमआयडीसीत एका खासगी कंपनीचे कंपनीचे अशोक जिंदाल हे मालक आहेत.जिंदाल यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात जिंदाल यांनी उदयनराजे यांचा साताऱ्यातील एक गुंड असा उल्लेख केला होता.
याचवरुन गुरुवारी (दि.२५ ) सायंकाळी इंदापूर शहरात जिंदाल यांची गाडी अडवत शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासत, त्यांची धिंड काढत त्यांना पोलिस ठाण्यात आणलं होतं.