मोरगिरी किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या हमरासला शिवदुर्गने दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:49 PM2022-11-03T12:49:57+5:302022-11-03T12:50:02+5:30
लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्राला याबाबत माहिती समजल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला व न घाबरता आहे तेथेच थांब, आम्ही तुला घेण्यासाठी येतो, असा विश्वास देत...
लोणावळा (पुणे) : केरळ राज्यातील हमरास नावाचा गडप्रेमी छत्रपती शिवरायांचे ३५० किल्ले पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून भटकंती करत आहे. आठ दिवसांपूर्वी तो लोणावळ्यात आला. तुंग किल्ल्याच्या शेजारी असलेल्या मोरगिरी किल्ल्यावर गेला असताना, त्याची वाट चुकली व तो खोल दरीत जाऊन अडकला. ही घटना २१ ऑक्टोबर रोजीची आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्राला याबाबत माहिती समजल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला व न घाबरता आहे तेथेच थांब, आम्ही तुला घेण्यासाठी येतो, असा विश्वास देत शिवदुर्गचे शिलेदार दुपारी दीड वाजता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये शोधमोहिमेला सज्ज झाले.
घुसळखांब, तुंग रोडवर जांभूळणे गावाजवळ गेल्यानंतर एका दुकानात त्यांना हमरास पुढे गेला असल्याचे समजले. त्याने पाठविलेले लोकेशन चेक करत सायंकाळी चारपासून शोधमोहीम सुरू झाली होती. त्याठिकाणी वयाची ६० वर्षे पार केलेले पण मनाने तरुण असणारे आखाडे बाबा यांनी शिवदुर्गच्या शिलेदारांसोबत मोरगिरी किल्ल्यावर शोधमोहिमेत सहभाग नोंदवला. जेथपर्यंत शक्य आहे तेथपर्यंत ते आले. पुढे खडा डोंगर असल्याने ते थांबले; पण बाकीचे शिलेदार शोधमोहिमेत गर्क होते.
पाऊलखुणा, मळलेले रस्ते, वाकलेले गवत या संकेतांचा वापर करत दाट धुक्यात वाट काढत शिवदुर्गचे पथक हमरासचा शोध घेत होते, तर खरेच कोणी आले की फक्त येतोय, असं सांगत आहेत. या चिंतेने हमरास व्याकूळ झाला होता. लोकेशन सतत खाली-वर, लांब-जवळ दिसत होते, एकमेकाला आवाज देणे, बॅटरीचा उजेड दाखवणे असे प्रकार करत सांकेतिक संदेश दिले जात होते. रात्र होऊ लागली होती. अखेर एका आवाजाला प्रत्युत्तर आले व सर्वांच्या जीवात जीव आला.