शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी खुला, तर शिवाई मातेचे मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:03+5:302021-09-19T04:12:03+5:30
-- जुन्नर : कोविड संक्रमणकाळात पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणारी, स्मारके, गड-किल्ले ...
--
जुन्नर : कोविड संक्रमणकाळात पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणारी, स्मारके, गड-किल्ले कोविड रुग्णसंख्या कमी होत असताना खुली करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्यावर शिवनेरी गड आणि लेण्याद्री येथील मंदिर परिसर भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे.
मात्र, ही स्मारके आणि गड-किल्ले खुली केली असली, तरी गणेशलेणी मात्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभागाची स्मारके, वास्तू वगळता किल्ले शिवनेरी परिसर देखभालीसाठी वनविभागाच्या ताब्यात आहे. १९ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा झाला होता. त्यानंतर शिवभक्त पर्यटकांसाठी शिवनेरी भेटीसाठी निर्बंध घालण्यात आले होते.
स्मारके, गड-किल्ले यावरील निर्बंध उठविण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या ८५९ पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली. आता मात्र बऱ्याच दिवसांपासून गडावर कोणताही मानवी वावर नव्हता. पावसाळ्यात गवत देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेत गडावर जावे, असे आवाहन वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार १७ सप्टेंबरपासून छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी शिवभक्तांसाठी तसेच लेण्याद्री येथील लेणी खुल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी जिल्ह्यातील स्मारके, गड-किल्ले खुले करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
--
चौकट
कोविडसंदर्भात खबरदारी म्हणून शारीरिक अंतर बाळगणे, मास्कचा, तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असल्याचे, तसेच यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आली आहे. लेण्याद्री येथील डोंगरावर मोठ्या प्रमाणात लेणी, सभामंडप, बौद्धस्तूप आहेत. सर्वांत मोठे सभामंडप व ओवऱ्या असलेल्या गणेशलेणीमध्ये गिरिजात्मजाची मूर्ती आहे. परंतु लेणी परिसर खुला आहे. मात्र गणेशलेणी गणेशभक्तांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.