सिद्धार्थ शिराेळे यांच्या उमेदवारीला विराेध ; घराणेशाही नकाे, शिवाजीनगरच्या नागरिकांचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:32 PM2019-10-01T16:32:20+5:302019-10-01T16:35:09+5:30
शिवाजीनगर येथील मतदारांकडून भाजपाच्या सिद्धार्थ शिराेळे यांच्या उमेदवारीला विराेध करण्यात येत आहे.
पुणे : भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून माजी खासदार अनिल शिराेळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिराेळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु आता शिराेळे यांच्या उमेदवारीला शिवाजीनगरमधील मतदारांकडून विराेध हाेत असून घराणेशाही नकाे असा नारा त्यांच्याकडून आता देण्यात येत आहे.
निवडणुक जवळ येत असल्याने आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काेथरुड विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचे समाेर आल्यानंतर त्यांना विराेध करण्यात आला. काेथरुड भागातील कर्वे पुतळा तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काेथरुडकरांना घरचा उमेदवार हवा आहे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले हाेते. तसेच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी देखील पाटील यांच्या उमेदवारीला विराेध दर्शवला आहे. शिवाजीनगरमध्ये विजय काळे हे विद्यमान आमदार आहेत. यंदा विजय काळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. लाेकसभेला 2014 ला निवडूण आलेल्या अनिल शिराेळे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्याऐवजी गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. त्यावेळी शिराेळे यांच्या मुलाला विधानसभेला उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले हाेते.
सिद्धार्थ शिराेळे हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. निवडूण आल्यापासून त्यांनी मतदारसंघामध्ये कधीच हजेरी लावली नसल्याचा आराेप शिवाजीनगर येथील पाेलीस लाईन मधील नागरिकांना केला आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात एक दिवसाआड पाणी येत असताना शिराेळे यांनी त्या संदर्भात काहीही केले नाही. पूर्वी या भागात त्यांचे वडील अनिल शिराेळे हे नगरसेवक देखील हाेते. त्यामुळे वडीलांनंतर मुलगा नगरसेवक झाला, आणि आता पुन्हा विधानसभेसाठी सुद्धा सिद्धार्थ यांना उमेदवारी मिळाल्याने आता या भागात घराणेशाही नकाे असे म्हणत नागरिकांनी भाजपाच्या शहर कार्यालयासमाेर आंदाेलन केले.
या भागातील नागरिक छाया चव्हाण म्हणाल्या, आम्हाला घराणेशाही नकाे, सिद्धार्थ शिराेळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. इतर कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी. शिराेळे यांनी गेल्या पाच वर्षात असे कुठले काम केले की त्यांना उमेदवारी देण्यात यावी. अशाेक रणदिवे म्हणाले, भाजपातील सिद्धार्थ शिराेळे यांना विराेध आहे. ते आमच्या भागात आले नाहीत. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना ते कधीच पुढे आले नाहीत.