बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात शिवलिंग पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:15 PM2021-07-23T13:15:44+5:302021-07-23T18:19:44+5:30
भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाने हाहाकार माजवला आहे
पुणे : पुण्यातील, जुन्नर, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात नद्यांना पुर आला आहे. त्यातच भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले असून शिवलिंग पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.
बाराज्योर्तिर्लींगापैकी एक असणार्या श्री क्षेञ भीमाशंकरकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे, खोर्याप्रमाणेच डिंभे परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. रस्त्यामध्ये मातीच्या ढीगार्यासह, दगड आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला होता. भीमाशंकर कडे जाणार्या लोकांनी दुपारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण मुसळधार पावसाने आता मंदिरातच पाणी साचल्याने दिसून आले आहे.
मंदिरात भाविकांना नो एन्ट्री
मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळुन तेच पाणी मंदिरात आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना एन्ट्री नाहीय. मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पुजा-अर्चा सुरु असते. मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.