शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’, मानाची गदा उंचावली, मैदानावर एकच जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 07:09 AM2023-01-15T07:09:39+5:302023-01-15T07:10:40+5:30
पैलवानांचे मानधन वाढविण्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: दुहेरी पटाला हात घालत चितपट डाव टाकून मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत पुण्याचा पठ्ठ्या शिवराज राक्षे याने ‘महाराष्ट्र केसरी’वर आपली मोहाेर उमटवली. हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने राक्षे याने मानाची गदा उंचावली आणि मैदानावर एकच जल्लोष झाला.
स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत अत्यंत जल्लोषात पार पडलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या शिवराज राक्षे याने नांदेडकडून खेळताना मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत केले. कार्यक्रमाला क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रीजभूषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.
वयोवृद्ध खेळाडूंनाही होणार मोठी मदत
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या राज्यातील मल्लांना सहा हजारऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल.
हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारांवरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजारांऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. थेट पोलिस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधीही दिली जाईल.
शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत चीतपट करून मानाची गदा जिंकली. शिवराज याची कुस्तीतील चपळाई पाहून वाह रे वाह माझ्या पठ्ठ्या... अशीच प्रतिक्रिया संपूर्ण मैदानात चाहत्यांकडून उमटली.