शिवरायांचा इतिहास पुन्हा जिवंत होणार; रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ सृष्टी साकारली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:46 AM2019-02-01T02:46:46+5:302019-02-01T06:50:56+5:30
प्राधिकरणाचा आराखडा : ८८ एकरांमध्ये प्रकल्प; ६०६ कोटींच्या निधीला मंजुरी
- नितीन शिंदे
पिंपरी-चिंचवड : देशातील सर्व गड-किल्ल्यांसाठी रोल मॉडेल रायगडच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन व विकासासाठी सुमारे ६०६ कोटींच्या आराखड्याला राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामध्ये रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचाड येथील दुर्लक्षित जिजाऊ वाड्याच्या परिसरातील ८८ एकरांत ‘जिजाऊ सृष्टी’ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ला रायगडावर झाला. त्यामुळे रायगडाला देशाच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. रायगडाच्या ऐतिहासिक वास्तूच्या विकासाचे मॉडेल बनवून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास देशातील व परदेशातील पर्यटकांना माहिती करून देण्यात येणार आहे. त्या उद्देशाने रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्य शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी केली. इंग्रज व मराठ्यांच्या युद्धात १८१८ मध्ये तोफांच्या माऱ्यामुळे रायगडावरील वास्तूचे नुकसान झाले. सभासद बखरीमध्ये रायगडावर ३५० वास्तू असल्याचा उल्लेख आहे. त्यातील अनेक मौल्यवान वास्तू व शस्त्रे जमिनीत गाडल्या गेली आहेत. त्यामुळे पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातन वास्तू तज्ज्ञांच्या सहाय्याने गडावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन सुरू आहे. पायथ्याला असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचे संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या पुरातन वास्तू व ऐतिहासिक शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची व गडकोटांची माहिती देणारे भव्य पुस्तकालय, पर्यटन माहिती केंद्र, जिजाऊंची महती देणारी सृष्टी, मावळ्यांची शौर्य व इतिहासाचे माहिती केंद्र, शिवकालीन ऐतिहासिक धाटणीचे व मराठा स्थापत्यशैलीतून जिजाऊ सृष्टी साकारण्यात येणार आहे. पर्यटकांना रायगडावर जाण्याचा मार्ग करण्यात येणार आहे, असे संभाजीराजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नवीन १६६ (एफ)महामार्ग
रायगडाकडे येणारे सर्व रस्ते महाड येथे एकत्र येतात. त्यामुळे महाड ते रायगड मार्गास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तसेच, या मार्गाला १६६ एफ नावाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. या महामार्गामुळे रायगड संवर्धन, पर्यटन, महसूल वाढ आणि स्थानिकांसाठी नव्याने रोजगारनिर्मिती होणार आहे.
नाने दरवाजा पुन्हा उभा पूर्व स्थितीत असलेला अर्धा भाग जसा आहे त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून पडका भाग उभा करण्यात येणार आहे. त्यामधील सैनिकी वास्तुशैली शिवभक्तांना अनुभवता येणार आहे. चित्त दरवाजा मार्गावर असणारा खुब लढा बुरुज याचेही जतन, संवर्धन सुरू करण्यात येत आहे. मशीद मोर्चाच्या भागात अनेक जुन्या वास्तू होत्या. त्यांचेही जतन, संवर्धन होणार आहे, अशी माहिती वास्तुसंवर्धक (काँजर्व्हेशन आर्किटेक्ट) वरुण भामरे यांनी दिली.
महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान या राज्यातही गडकोटांची संख्या जास्त आहे. पर्यटन व्यवसाय हा राजस्थानच्या महसुलाचा कणा आहे. राजस्थानातील गडकोटांच्या संवर्धनामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित झाले आहेत. त्याच धर्तीवर रायगड जतन व संवर्धन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती जागतिक पातळीवर नेऊन परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात येणार आहे.
- खासदार संभाजीराजे छत्रपती,
अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण
स्थानिकांना रोजगार
पाचाड येथील जिजाऊंच्या वाड्यांभोवती (घेरा रायगड) म्हणजे किल्ल्याच्या परिसरातील २१ गावांचा विकास प्राधिकरणातर्फे करण्यात येणार आहे. या गावांत रस्ते, पाणी, वीज व आरोग्याच्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. रायगडाच्या पर्यटन विकासामुळे परिसरातील गावांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.