‘शिवरायांची प्रेरणा देशासाठी मोठी’
By admin | Published: March 17, 2017 01:43 AM2017-03-17T01:43:30+5:302017-03-17T01:43:30+5:30
शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव
नारायणगाव : शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव छत्रपती शिवाजीराजे आहेत़ देशावर कुठलेही संकट किंवा अतिक्रमण असो, मुंबईतील हल्ला असो, कारगिलचा हल्ला असो किंवा जम्मू काश्मीरमधील पूंछ येथील लढाई असो, या सर्व लढायांमध्ये सर्वांत जास्त शहीद होणारांची संख्या ही महाराष्ट्रातील आहे. कारण मातीसाठी मरणार, हाच तर संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे़, असे मत शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले़
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्रावर व्याख्यान देताना नितीन बानगुडे पाटील बोलत होते़ या वेळी जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, ललिता चव्हाण, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, शरद चौधरी, संतोष खैरे, गणेश कवडे, सुजित खैरे, जंगल कोल्हे, योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, संतोश दांगट, अनिल खैरे, ज्ञानेश्वर औटी, आरीफ आतार, योगेश गांधी, भागेश्वर डेरे, राजेश बाप्ते, मंदार पाटे, मयूर विटे, रोहित भूमकर, अमोल जगताप, संदीप मुळे उपस्थित होते़
दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव ते शिवनेरी अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत ५०० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता़ नारायणगाव बाजारपेठेतून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विरोबा मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, औंदुबर स्वराज्य मित्र मंडळ, कुलस्वामिनी मित्र मंडळ आदींनी सहभाग घेतला होता़
सत्यशील शेरकर म्हणाले, की तिथी असो तारीख जुन्नर तालुक्यात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो़ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा ३६५ दिवस जरी केला तरी तो कमीच आहे़
माऊली खंडागळे म्हणाले, की शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळ्यात पाश्चात्य देशातील नागरिक किल्ल्यावर आले होते़ त्यांना आम्ही विचारले तुम्ही या ठिकाणी का आलात, तर त्यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुण्यस्थानला मुजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. यावरूनच शिवाजीमहाराजांची ख्याती असून भारतात नव्हे तर सर्व देशांमध्ये युद्धनीती अभ्यासली जात आहे, ही आपल्या दृष्टीने गौरवाची बाब आहे़
याप्रसंगी आशाताई बुचके, ललिता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले़
या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गुंजाळ, अशोक गांधी, सुंदराताई कुऱ्हाडे, खंडू मेहेत्रे, किसन डेरे, अक्षय बोऱ्हाडे, डॉ. एम. बी. भोर, किरण सोलाट, योगेश (बाबू) पाटे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़
ज्ञानेश्वर औटी, मेहबूब काझी, हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब पाटे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)