शिवाजी महाराजांनी रयतेच्या नावाने राज्य चालवले, त्यांचा आर्दश घेण्याची गरज : शरद पवार
By अजित घस्ते | Published: June 6, 2023 05:25 PM2023-06-06T17:25:04+5:302023-06-06T17:26:56+5:30
घराण्याच्या नावाने राज्य चालवंल नाही तर रयतेचं राज्य चालवले याचा आर्दश घेण्याची गरज...
पुणे : देशात अनेक राजे होऊन गेले, देवगिरीचे यादव, दिल्लीचे मुघल, आदिलशाह होऊन गेले. अशी अनेकांची नावे सांगता येतील ज्यांनी राज्य केलं. पण त्यांचं राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. याला एकच अपवाद म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे भेदभाव न करता रयतेचे राज्य केले. त्यांनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही. तर त्यांनी उभं केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. साडेतीनशे वर्षाच्या इतिहासात आजही सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणात रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. त्यांचा आर्दश डोळ्यासमोर ठेवला जातो. रयतेचं राज्य चालवायचे असले तर छत्रपतीचा आर्दश घेण्याची गरज असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाल महालात ३५० वर्षे व्या शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अभिषेक शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर, विकास पासलकर, काँग्रेसचे मोहन जोशी, दीपक मानकर, चंद्रकांत मोकाटे, रोहित टिळक, चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव, ज्ञानेश्वर मोळक, राजाभाऊ पासलकर, संतोष शिंदे तसेच विविध राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैदिक विद्यालयात धार्मिक विधीचे प्रशिक्षण घेतलेले शिवसेवक कैलास वडघुले यांनी राज्याभिषेक विधी पार पाडले. शस्र पूजन, शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेली फळे, धान्य यांच पूजन, छत्रपती शिवराय त्यांच्या नित्य वापरातील कवड्याच्या माळेचे पूजन, राजमुद्रेचे पूजन करण्यात आले. तसेच संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करण्यात आले. समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.