आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:09 AM2019-03-05T01:09:17+5:302019-03-05T01:09:22+5:30

महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विधानसभेकरिता शिवसेना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

 Shivsainik's Elgar Against MLA Sharad Sonawane | आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

Next

नारायणगाव : महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विधानसभेकरिता शिवसेना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर पक्षाने शिवसैनिकांची भुमिका ऐकून न घेता सोनवणे यांना उमेदवारी दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आपल्या पदाचे तसेच तालुक्यातील पंचायत समिती सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य व इतर पदावर कार्यरत असलेले सदस्य आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा नारायणगाव येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शिवसैनिकांनी आमदार शरद सोनवणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शविला असून, बाहेरचा उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नाहीत अशी भूमिका स्पष्ट करीत तालुक्यातील सर्व पदाधिकारी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा लोकसभेचे काम न करण्याची भूमिका पदाधिकारी यांनी घेतल्याने जुन्नर तालुक्यात शिवसेनेमध्ये भगवे मोठे वादळ माजले आहे.
नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर सोमवारी शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत सोनवणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या बैठकीला शिवसेनेच्या जि.प. गटनेत्या आशा बुचके, जि.प. सदस्य गुलाब पारखे, तालुका समन्वय प्रसन्ना डोके, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा समन्वय संभाजी तांबे, बाजार समिती सदस्य आनंद रासकर, मंगेश काकडे, बाळासाहेब पाटे, सभापती ललिता चव्हाण, माजी सभापती संगीता वाघ, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, पं.स. सदस्य दिलीप गांजळे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, जीवन शिंदे, उपजिल्हा प्रमुख व विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, उपसरपंच संतोष दांगट, युवा सेना उपतालुका प्रमुख अभिषेक वर्पे, विकी पारखी, आरीफ आतार, बाजीराव लाड, बब्बू भंडलकर यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>शिवसेनेत आमदार शरद सोनवणे यांना घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आ. सोनवणे यांनी सर्वच पक्षांकडून पोळी भाजून घेतलेली आहे. त्यांची कोणत्याही पक्षात एकनिष्ठ नाही. सन २००९ ला उमेदवारी देण्यावरून संघर्ष झाला नसता तर त्याच वेळी शिवसेनेचा आमदार असता. पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा, जर केला नाही तर जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. - आशाताई बुचके.
पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये. सोनवणे हे शिवसेनेत येणार अशी संभ्रमावस्था शिवसैनिकांमध्ये आहे. जुन्नर तालुक्यात पंचायत समिती, नगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. विघ्नहर कारखाना व बाजार समितीमध्ये सेनेचाच सहभाग आहे. असे असताना शिवसैनिकांना विश्वासात न घेता ज्यांनी शिवसेनेला त्रास दिला अशा आ. सोनवणे यांना उमेदवारी दिली तर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील. - प्रसन्न डोके

Web Title:  Shivsainik's Elgar Against MLA Sharad Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.