सचिन अहिर म्हणाले, "फ्लोअर टेस्टचे सोडा, रोड टेस्टमध्ये पहा काय होतेय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:48 AM2022-06-27T08:48:03+5:302022-06-27T08:49:42+5:30
पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
पुणे : कमळीच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. विधिमंडळात फ्लोअर टेस्टमध्ये काय व्हायचे ते होईल, पण रोड टेस्टमध्ये काय होतेय ते पहा, तुम्ही मतदारसंघांत तोंड दाखवू शकणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिला.
शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना व पदाधिकाऱ्यांचा मेळावा टिंबर मार्केटमधील सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजिला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी आमदार महादेव बाबर, शहर अध्यक्ष संजय मोरे, अजय भोसले आदी नेते उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, शिवसेना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही आम्हाला संपविण्याचा प्रयत्न कराल, त्या त्या वेळी शिवसेना पुन्हा भरारी घेईल. सत्ता तुम्हाला मिळेल, मोठी पदे मिळतील, पण ज्यांनी बंडखोरी केली, तुम्ही संपूर्ण विचार, पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहात. जर हिंमत असेल तर प्रथम आमदारकीचा राजीनामा द्या, मग लोकांसमोर जाऊन सांगा.
शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची टिंबर मार्केट ते रामोशी गेट दरम्यान प्रतीकात्मक अंत्ययात्रा शववाहिकेतून काढण्यात आली. शववाहिकेवर ‘बंडखोर आमदार पंगतीतले कावळे, बंडखोर आमदार डोमकावळा’ हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.