कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 08:30 PM2024-03-09T20:30:21+5:302024-03-09T20:32:27+5:30

संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

shivsena mp Sanjay Rauts attack on eknath shinde ajit pawar from Supriya Sule campaign meeting | कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

Sanjay Raut ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आज भोर तालुक्यात मविआची जाहीर सभा घेण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हेदेखील हजर होते. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी महायुतीवर टीका करताना म्हटलं आहे की, "पवार साहेबांनी व्यासपीठावरून मला दाखवले, पाहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. सूर्य मावळल्यानंतर या प्रकाशात टोप्या अजून उजळून निघाल्या. स्वच्छ चकचकीत या टोप्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेल्या नाहीत. या ओरिजिनल, प्रामाणिक टोप्या आहेत आणि मुख्यतः बदलणाऱ्या टोप्या नाहीत. सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांची नक्कीच कर्जमाफी करू, पण गद्दारांना माफी करणार नाही. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो पळकुट्यांचा नाही," असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

- जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली, तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. 

- शरद पवार हे राजकारणातले पितामह आहे. 

- देशाचे प्रधानमंत्री म्हणतात, अब की बार ४०० पार; त्यावर आम्ही घोषणा करू, आपकी बार भाजपा तडीपार..! 

- मिशन ४५ अशी घोषणा अमित शहांनी केली. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. 

- हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला. मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्यांनी शिकवलं आहे. कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे हे त्यांनी शिकवलं. वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला आहे. त्यामुळे, तो अध्यक्ष आहे. 

- ही लढाई बारामतीची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि पवार साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. 

Web Title: shivsena mp Sanjay Rauts attack on eknath shinde ajit pawar from Supriya Sule campaign meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.